दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
घिर्णी ( मलकापूर): सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर आला असून बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त आहे. अशातच बुलडाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सततच्या नापिकीला कंटाळून बुलडाण्यात एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.विजय किसन गव्हाळे (वय 35) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकयाचे नाव आहे.
नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे ही चिंता जिव्हारी लागल्याने विजय यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. मलकापुर तालुक्यातील घिर्णी गावात ही घटना घडली. प्राथामिक माहितीनुसार, विजय गव्हाळे यांच्याकडे २ एकर शेती आहे. या शेतीवरच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गेल्या काही वर्षापासून सततची नापीकी असल्याने बँक ऑफ महाराष्ट्रचे त्यांनी ५४ हजार रुपये कर्ज काढले होते.
मात्र, शेतीत पैसा गुंतवून सुद्धा अपेक्षित यश मिळत नसल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढ़त गेली. पेरणी तोंडावर आल्याने त्यांच्याकडे पेरणीसाठी पैसे नव्हते. आता कर्ज कसे फेडावे आणि शेतातील पेरणीसाठी पैसे कुठून आणावे या चिंतेत शेतकऱ्याने आत्महत्या केली. विजय यांनी अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
