दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर प्रतिनिधी— एका नव्या स्वतंत्र नीतीमान आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीचे खरे शिल्पकार राजे म्हणजे छत्रपती शिवाजीराजे होते. त्यांचे मोठेपण सर्वांगीण, विविध गुणसंपन्न असे होते.त्यांच्या पाहिल्या वैदिक पद्धतीने केलेल्या राज्याभिषेकाने त्यांना परिपूर्ण समाजमान्यता मिळत नसल्याने त्यांनी दुसर्यांदा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतल्याने स्वराज्याचे अधिकृत छत्रपती राजे बनले. म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा अत्यंत महत्त्वाचा ठरला असे मत बिरादार आनंद नरसिंगराव यांनी व्यक्त केले.
शिवराज्याभिषेकच्या शुभयोगदिनी चला कवितेच्या बनात आयोजित 266 व्या छत्रपती शिवराज्याभिषेक दिन विशेष वाचक संवाद मध्ये डॉ.आ.ह.साळुंखे लिखित छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक या साहित्यकृतीवर संवाद साधताना शौर्यशाली खरा स्वराज्यरक्षक, तत्त्वज्ञानी, स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व असणारा राजा ज्याच्या वागण्यातला बाणेदारपणा संयमी वृत्ती यामुळे साऱ्यांच्या मनावर त्यांनी अधीराज्य निर्माण केलं होतं.असे मत बिरादार यांनी व्यक्त केले.
सुरेश वजनम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वचन चळवळीला गती देणारे किशन उगले व भरत पुंड यांना वाचकमित्र शिक्षक पुरस्कार तर डॉ.जोतिबा भदाडे यांना वाचकमित्र रसिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अँड. शिवाजी कोकणे, नरसिंह ढोणे, उमाकांत वडजे,रामभाऊ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन वीरभद्र स्वामी यांनी केले तर आभार प्रा.राजपाल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक अनंत कदम, तुळशीदास बिरादार, स्वामी योगेश आदींनी परिश्रम घेतले.
