दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील टापरगावात एका धक्कादायक घटना घडली असून, सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने एका युवकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल रमेश लव्हाळे (टापरगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे हा जखमी अवस्थेत गुरुवारी सकाळी घरी आला आणि घराजवळ येऊन अचानक बेशुद्ध होऊन कोसळला. विशालच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान विशालला कुणी मारहाण केली आणि तो जखमी कसा झाला असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर विशालच्या वडिलांनी याप्रकरणी कन्नड ग्रामीण तक्रार दाखल केली होती. तसेच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी कसून तपास केला होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात, कृष्णाने विशालला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल आणि आपल्या बहिणीचे प्रेमप्रकरण असल्याचा संशय कृष्णाला होता. त्यामुळे त्याने विशाल लव्हाळेला बोलावून लाकडी दांड्याने मारहाण केली. यात अणकुचीदार लाकडी काठीने डोक्यात मारल्याने विशाल हा मरण पावला. तसेच विशालसोबतच्या गणेश औटे व उमेश मोरे यांनाही आरोपीने मारहाण केली. मृताचे वडील रमेश सांडू लव्हाळे यांनी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी दिली होती. यावरून कन्नड ग्रामीण पोलिसांनी तपास करत, आरोपी कृष्णा दिगंबर पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
विशाल लव्हाळे यांचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती झाल्यानंतर आरोपी कृष्णाने आपल्या वडिलांच्या मोबाइलवरून विशालला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर तो चिंचोली परिसरात गेला असता तिथेच त्याला लाकडी दाड्याने बेदम मारहाण केली. विशाल गंभीर जखमी अवस्थेत टापरगाव येथे घरी आला. मारहाण जास्त झाल्याने तो घरी आल्यावर जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
