दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर):ग्रामपंचायत शेटफळ हवेली कडून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्याच्या ७६ वर्षपूर्ती निमित्त देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत शेटफळ हवेली यांच्या वतीने अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी सकाळी ग्रामपंचायत शेटफळ हवेली कार्यालयापुढे थोर स्वातंत्र्यसेनानी कै. ज्ञानदेव मारुती भोंगळे यांच्या सुनबाई श्रीमती रंजना चंद्रकांत भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर ग्रामपंचायत कार्यालयापुढील पटांगणावर उभारलेल्या शिला फलकाचे पूजन देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीर कै. ज्ञानदेव मारुती भोंगळे, शहीद संतोष रामहरी सावंत, शहीद शिवाजी श्रीरंग रणदिवे या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दिवे पेटवून माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेलीचे मुख्याध्यापक डोंबाळे सर यांनी पंचप्राण शपथ दिली.
यावेळी माजी सैनिक मेजर मारुती निकम यांनी उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना आपण सीमेवर असताना देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कसे रक्षण करावे लागते,त्याच बरोबर आजच्या घडीला जवान हे देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जाण्यासाठी समोर येत नसल्यामुळे खंत व्यक्त केली.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर व्यायाम करून देश सेवेसाठी पुढे आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी हनुमंत शिंदे व बाळासाहेब करगळ यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना देश सेवेसाठी बलिदान दिलेल्या व कार्य करत असलेल्या जवानांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.या नंतर गावातील माजी सैनिकांचा व आता देशसेवेसाठी काम करत असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा यावेळी ग्रामपंचायत शेटफळ हवेली यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.या नंतर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी माजी सैनिक, ग्रामपंचायत च्या सरपंच रूपाली संतोष पवार, उपसरपंच सचिन ज्ञानदेव शिंदे, ग्रामपंचायत चे आजी माजी सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत चे कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन त्यांचे सहकारी, जेष्ठ नागरिक,विद्यार्थी,शिक्षक,पालक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका व ग्रामस्थ मोठय़ा सख्येने उपस्थित होते.
