येरगी येथे घंटा गाडी व सीसीटिव्ही कॅमेरा चा लोकार्पण…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर): देगलूर तालुक्यातील येरगी गावाला चालुक्य कालीन ऐतिहासिक वारसा लाभला असून त्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी व गावाचा विविध अंगी विकास साधण्यासाठी सरपंच संतोष पाटील व गावकरी यांच्याकडून चालू असलेले सामूहिक प्रयत्न आणि गावच्या विकासाचा आदर्श महाराष्ट्रातील इतर गावांनी घ्यावे असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
ते काल रविवारी येरगी येथे घंटा गाडी व सीसीटिव्ही कॅमेरा यांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
देगलूर तालुक्यातील येरगी येथे घंटागाडी व सौर ऊर्जेवर चालणारी स्वयंचलित सीसीटिव्ही कॅमेरा यांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटक व अध्यक्षपदी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर देगलूर चे तहसीलदार राजाभाऊ कदम,उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख,मरखेल चे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप,गटविकास अधिकारी शेखर देशमुख,पुरातत्व विभागाचे संशोधक अभ्यासक डॉ. कामाजी डक, देगलूर चे पोलिस निरीक्षक संजय हिबारे,सरपंच संतोष पाटील,पत्रकार शिवानंद स्वामी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व प्रमुख पाहुणे यांचे येरगी ग्राम पंचायत कडून चालुक्य कालीन सरस्वती मातेची प्रतिमा व येरगी सांस्कृतिक झरा हा कॉफी टेबल बुक देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तीन देशभक्ती गीतावर लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण गावचे सरपंच संतोष पाटील यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे पुढे म्हणाले की येरगीतील पुरातन वस्तूंचा संग्रह ही ऐतिहासिक संपत्ती असून तो एक अनमोल खजिना असून त्याचे जतन व संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत.गावाची ख्याती जेवढी दूरवर पसरेल तेवढे या गावचा विकास होण्यास मदत मिळेल.येरगी येथील चालुक्य कालीन ठेवा,त्याकाळचा पेहराव कसा होता,त्यांची खाद्य संस्कृती,त्यांचे जलव्यवस्थापन कसे होते याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच चालुक्यकालीन पेहराव घालून त्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन पथनाट्याद्वारे केले गेले तर ते पर्यटकांसाठी फार प्रभावी ठरेल.ते म्हणाले कि तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे गावच्या विकासाचे वाहक असून त्यांच्या आणि ग्रामपंचायत च्या समन्वयाने विकास साधावा असे ते म्हणाले.
यानंतर पुरातत्व अभ्यासक डॉ. कामाजी डक म्हणाले कि येरगी हे एक शक्तीपीठ आहे ज्यामुळे वारंवार येरगी येथे यावे वाटते. त्यांनी येरगी येथील चालुक्य कालीन सरस्वती ची मूर्ती,सप्तमातृकापट,शिवमंदिर,शिलालेख,चालुक्यांचा इतिहास,गावातील चालुक्य कालीन विहिरी ,बारवा यांची सविस्तर माहिती दिली.
यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,तहसीलदार राजाभाऊ कदम,उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख,सुरज जगताप,गटविकास अधिकारी शेखर देशमुख,पोलीस निरीक्षक संजय हिबारे,डॉ.कामाजी डक यांनी गावातील शिवमंदिर,विहिरी व बारावा यांची पाहणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वाडीकर यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच संतोष पाटील,राजेश तोटावाड ,सर्व ग्राम पंचायत सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक अशोक देवकत्ते आदींनी परिश्रम केले.
