दै.चालु वार्ता: प्रतिनिधी
अशोक कांबळे
गारगोटी: वट सावीत्री सण हा हिंदू धर्मातील महिलांसाठी एक महत्त्वाचा सण आहे. हा सण मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा सण वट (वड) वृक्षाच्या पूजेसाठी ओळखला जातो आणि प्रामुख्याने सौभाग्यवती (विवाहित) स्त्रिया साजरा करतात. पण हा सण साजरा होत असतांना त्यामध्ये विधवा महिलांना अजिबात स्थान नसते किंवा सहभागी करून घेतले जात नाही. केवळ आणि केवळ हा सण सौभाग्यवती महिलांच्यासाठीच आहे. आपला पती हयात नसल्याने अगोदरच विधवा महिलांना अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच हळदी कुंकू, शुभ समारंभ या ठिकाणी विधवा स्त्रियांच्यावर समाजाने अघोषित बहिष्कार टाकलेला आहे. त्यातच वट सावित्री सण म्हणजे सौभाग्यवती महिला व विधवा महिला यांच्यामध्ये अधिकच दरी निर्माण करणारा निवळ देखावा ठरत आहे. त्यामुळे विधवा महिलांच्या मनाला होणाऱ्या वेदनांचा समाजानेच आता पुढे होऊन विचार करणे अपेक्षित आहे.
वट सावित्री सणाची कथा अशी सांगितली जाते.
‘ की सती सावीत्री आणि तिचा पती सत्यवान एक धर्मात्मा राजपुत्र होता, ज्याचे आयुष्य अल्पकाळ असणार असल्याचे भविष्य वर्तवले होते. त्याची पत्नी सावीत्री ही अत्यंत पतिव्रता आणि धैर्यशील स्त्री होती. जेव्हा यमदेव सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आला, तेव्हा सावीत्रीने आपल्या पतिव्रतेच्या बलाने आणि धैर्याने यमदेवाला प्रभावित केले आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. या घटनेच्या स्मरणार्थ वट सावीत्री सण साजरा केला जातो.
वट सावीत्रीच्या दिवशी स्त्रिया उपवास धरतात. उपवासाच्या काळात फळं, पाणी आणि विशिष्ट पदार्थ सेवन करण्याची परवानगी असते. स्त्रिया वट वृक्षाच्या भोवती धागा गुंडाळतात आणि वृक्षाचे पूजन करतात. वट वृक्ष हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. स्त्रिया वट वृक्षाला पाणी देतात, फुले अर्पण करतात आणि त्याच्या भोवती धागा गुंडाळतात. पूजा करताना सती सावीत्री आणि सत्यवान यांची कथा वाचली जाते. यामध्ये सावीत्रीच्या पतिव्रतेचे वर्णन आणि तिच्या धैर्याचे गुणगान केले जाते. पूजेच्या शेवटी स्त्रिया एकमेकांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वट सावीत्री सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा सण पतिपत्नीसाठी एकमेकांप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि समर्पण यांचे प्रतीक आहे. वट वृक्षाची पूजा करून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. वट सावीत्री सण स्त्रियांच्या भक्ती, निष्ठा आणि पतीप्रेमाचा उत्सव आहे, असे मानले जाते. परंपरेने अनेक पिढ्यांपासून हा सण साजरा केला जात आहे.’
मात्र हा सण साजरा करत असताना आपल्याच आजूबाजूला, घरात, नातेवाईकांच्या मध्ये काही विधवा महिला असतात, काहींचे पती आजारी पडून, अपघातात, सैन्यदलात कर्तव्ये बजावत असताना धारातीर्थी पडलेले असतात. अश्या महिलांना वास्तविक समाजाने सन्मान द्यायला हवा, प्रत्येक कार्यात सहभागी करून घ्यायला हवे, याउलट विधवा महिलांना हिनतेची वागणुक पायरी पायरीला दिली जात असते, दुजाभाव केला जातो, किंवा दुर्लक्षित केले जाते. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन आता दुर्दैवाने अकाली विधवापन येणाऱ्या महिलांना आदर आणि आधार देण्यासाठी ग्रामसभेत ठराव केले आहेत. मंगळसूत्र, बांगड्या यांचा त्याग न करता ते विधवापन आल्यानंतर सुद्धा सुरू ठेवावेत असा निर्णय घेत आहेत.
तरीसुद्धा महिला महिलांमध्ये दुही निर्माण करणारे हळदीकुंकू, वट सावित्री व शुभ समारंभ विधवा महिलांच्या साठी यातनादायी ठरत आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे.
