दै चालु वार्ता नांदेड
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, मार्च-एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या गारपिठ व अवकाळी पावसामुळे, जुन-जुलै २०२२ मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे व नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत ५ लाख १४ हजार १८३ शेतक-यांना ४१५कोटी रुपयांचे अनुदान बॅंक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यांतील ६६ हजार ३३९ शेतकरी यांनी ई-केवायसी न केल्यामुळे रक्कम रुपये ४२ कोटी नुकसान भरपाईचा निधी प्रलंबित आहे. तरी शेतक-यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
त्याअनुषंगाने मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून VK (विशिष्ट क्रमांक) घेऊन ई-केवायसी (e-Kyc)करणे बंधनकारक आहे.
त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही. अशा शेतक-यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ती करून घ्यावी अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
