दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
आजच्या तंञज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेञात परिवर्तनाचे नवे वारे वाहू लागले आहेत.शैक्षणिक क्षेञात नवनवे प्रयोग होत आहेत.जिल्हा परिषद शाळा नविन रूप धारण करीत आहेत.डिजिटल क्रांतीतून शाळा शाळामधून अनेक प्रयोग होत आहेत.
विचारवंत एमर्सन म्हणतात, “माणसाचे जीवन प्रयोगाने पूर्ण होते.जीवनात जेवढे अधिक प्रयोग कराल,तेवढे तुम्ही अधिकाधिक परिपक्व व्हाल.” त्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक शिक्षक,केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी प्रयत्नशील आहेत.
त्यापैकी एक “ज्यांची मुर्ती लहान पण किर्ती महान” असलेले कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर शिक्षणविस्तार अधिकारी –
मा. श्री विठ्ठलराव नारायणराव वडजे साहेब.
यांचा जन्म नायगाव तालुक्यातील कारला या छोट्याशा गावतील शेतकरी कुटूंबात आई- पार्वताबाई व वडील – नारायणराव यांच्या पोटी दि.14 जून 1966 रोजी झाला. त्यांचे बालपणीचे इ.पहिली ते इ. चौथीपर्यंतचे शिक्षण हे जि. प. प्रा. शा. कारला येथील शाळेमध्ये झाले. या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पुढील इ.आठवी ते इ.दहावी पर्यंतचे शिक्षण आई वडीला पासून घरापासून दूर हुतात्मा माधव विद्यालय मुखेड ता.मुखेड येथील शाळेमध्ये झाले, शिक्षणासाठी त्यांना भरपूर परिश्रम घ्यावे लागले.त्यांना स्वतःच्या हाताने चुलीवर स्वयंपाक करून खाऊन शिक्षण घ्यावे लागत असे, अशा कठिण परिस्थितीत त्यांनी इ.दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे इ. अकरावी व इ.बारावी विज्ञान शाखेतून जिद्द,चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी चांगले गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले व शासकीय अध्यापक विद्यालय, नांदेड येथे डी.एड. ला प्रवेश घेऊन चांगल्या गुणांने डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.
वाचन करणे,मैञी करणे व माणसे जोडणे हे साहेबांचे छंद होते.
“ज्ञान दान हे सर्वश्रेष्ठ दान” असल्यामुळे त्यांनी ज्ञानदानाचा वसा हाती घेऊन दि.18 जून 1986 रोजी जि प प्रा शा गोजेगाव ता.मुखेड या शाळेत “प्राथमिक शिक्षक” या पदावर उपस्थित झालेत.व याच शाळेतून त्यांनी आपल्या ज्ञानदानाच्या कार्यास सुरुवात केली. ज्या गावातील शाळेमध्ये ते ज्ञानदान करायचे त्याच गावांमध्ये ते मुक्कामी राहून जादा तासिका घेऊन ज्ञानदान करत असल्यामुळे त्यांचे विद्यार्थी व पालकांसोबत जिव्हाळ्याचे नाते तयार झाले., त्यांनी रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा जादा क्लास घेऊ लागले, विद्यार्थ्याच्या आवडी-निवडीनूसार त्यांचे छंद जाणून घेऊन विद्यार्थ्यासोबत कबड्डी, खो-खो,क्रिकेट,लेझीम,डेंबल्स,मलखांब इ.खेळ खेळू लागले.तसेच नवोदय प्रवेश पूर्वपरीक्षा व स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी जादा तासिका घेत असत, विद्यार्थ्यांना विविध विषयावर सखोल मार्गदर्शन मिळू लागले, आणि बघता बघता दहा वर्षात गोजेगाव चे ते एक होतकरू, अभ्यासू, मेहनती व उपक्रमशील आदर्श शिक्षक म्हणून नावारूपास आले व त्यांचे गोजेगावच्या परिसरात नावलौकिक झाले. आणि पुढे त्यांचा सन 1989 मध्ये सुरेखा भगवानराव माने रा.हानेगाव यांच्याशी विवाह झाला. त्यांनी ही एक आदर्श शिक्षिका आहेत. गोजेगाव येथील 10 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर ते बदलीने जि प प्रा शा नूतन, देगलूर येथे 5 वर्षे सेवा केली, आणि ऑगस्ट 2002 मध्ये “पदवीधर शिक्षक” म्हणून जि. प.प्रा.शा. भक्तापूर येथे उपस्थित झाले. तेथे फक्त नऊ महिने सेवा पूर्ण करून ते परत प्रा.शा देगलूर येथे सहा वर्षे पूर्ण सेवा केली, आणि तेथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून तीन वर्ष कामकाज पाहिले. सर्व शिक्षकांना सोबत घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी संख्या वाढवली, असे अनेक उपक्रम राबवून उत्कृष्ट कार्य केले.शिक्षकी पेशेमध्ये विद्यार्थीप्रिय असलेले वडजे सर अध्यापनही समरसून करत असत.त्यांनी अनेक प्रशिक्षणे घेऊन स्वत:ची गुणवत्ता सिध्द केली आहे.त्यांनी शिक्षकी पेशेत असताना साधनव्यक्ती म्हणुनही उत्कृष्ट कार्य केले.
शिक्षकी पेशात उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य करत श्री वडजे साहेबांनी स्वत:च्या शैक्षणिक पाञतेत वाढ करून एम. ए. बी. एड.चे शिक्षण पूर्ण करुन त्यांनी उच्च विद्या विषूषित आहेत त्यामुळे त्यांना जुलै-2009 मध्ये मुखेड तालुक्यातील संकुल – रावणगाव येथे “केंद्रप्रमुख”या पदावर पदोन्नती मिळाली.
शिक्षण प्रेमी वडजे साहेबांसमोर त्यावेळी लेंडी धरणातील बुडीत क्षेत्रातील शुष्कतेच मोठे आव्हान होतं, तेव्हा त्यांनी सर्व शिक्षकांना सोबत घेऊन आपल्या रावणगाव केंद्रामध्ये शिक्षकांच्या क्रिडा क्षेत्रातील व इतर स्पर्धेमध्ये तालुक्यात केंद्राचे नाव उज्वल केले, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण होण्यासाठी नवोदय पात्र व स्कॉलरशीप धारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करुन हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. दरवर्षी पाच सप्टेंबरच्या दिवशी शिक्षक दिनी आपल्या केंद्रात उत्कृष्ट कार्य करणार्या किमान तीन शिक्षकांचा गुरु गौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करून उच्च लेव्हलच्या अधिकार्याच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करत असत.यामुळे चांगले काम करणार्या शिक्षकांच्या पाटीवर एक प्रकारे शाब्बासकीची थाप देणे, शिक्षकामध्ये प्रेरणा,उत्साह व नवचैतन्य वाढवण्याची तसेच शिक्षकां-शिक्षकांमध्ये चांगले कार्य करण्यासाठी स्पर्धा लावण्याची ही त्यांनी सूरू केलेली परंपरा आजही कायम आहे.
तेथून त्यांची बदली देगलूर तालुक्यातील भायेगाव या केंद्रात झाली,मी या केंद्रातील देगाव (बु) या शाळेत “प्राथमिक पदविधर शिक्षक” म्हणून कार्यरत होतो. आणि तेथेच त्यांच्या सहवासात मला बरंच काही शिकता आले.सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात शिक्षकांकडून सर्व नोंदी पूर्ण करून घेणारे केंद्रप्रमुख वडजे साहेबांच्या रूपाने पाहायला मिळाले. आम्हा शिक्षकांच्या कामात काही उणिवा असल्यास ते स्वतः ते दूर करून द्यायचे, मूल्यमापनातील संविधान तक्ता स्वतः बनवून द्यायचे. प्रश्नपेढी स्वतः बनवून द्यायचे, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी देगावच्या जि.प. शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत,यामध्ये वनराई बंधारा,वनभोजन, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, नवीन जलकुंभाचे उभारणी ,स्काऊट-गाईड पथकाची निर्मिती,रक्तदान शिबीराचे आयोजन,असे अनेक सेवा प्रकल्प राबविलो आहे. जनगणना, राष्ट्रीय सण , संविधान दिन इ.विषयी विशेष उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यासाठी गणित शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात सलग पाच वर्ष विजेतेपद, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी बेसिक स्कील डेव्हलपमेंट प्रोजेक्ट,नवोदय व शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी करून घेण्यासाठी जादा तासिका,, संगणक कक्षाचे उद्घाटन, वाचनालयाचे उद्घाटन, लक्षवेधी नमस्कार, ज्ञानरचनावाद इ. विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले गेले.चालता-बोलता उपक्रम घेऊन निसर्ग शाळेचे आयोजन ,बाल विज्ञानभवनाला भेट, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान,पालक-मेळाव्याचे आयोजन,अध्ययन-अध्यापनात ए. बी. एल. पद्धतीचा वापर करणे इ.उपक्रम राबविलो आहेत, समाज प्रबोधनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वडजे साहेबांचे मार्गदर्शन मिळाले.अशा प्रकारे मी विठठलराव वडजे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम अतिशय उत्कृष्टपणे राबवून माझ्या सेवेच्या 12 व्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार मिळविण्यात यशस्वी झालो.
विद्यार्थी जीवनातच त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबतीने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता, संपूर्ण जिल्हाभर सात दिवसाचा सायकल कॅम्प घेऊन कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, शिक्षणाचे महत्व इ. ज्वलंत विषयावर रात्रभर मुक्कामी राहून समाजात समाजप्रबोधन व जनजागृतीचे कार्य केले. शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शिवाजीराव पाटील प्राथमिक शिक्षक संघ, नांदेड या संघटनेचे ते “जिल्हा कोषाध्यक्ष” म्हणून सात वर्षे काम पाहिले, व प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेचे “जिल्हा उपाध्यक्ष” म्हणून काम केले,तसेच केंद्रप्रमुख संघटनेचे “जिल्हाध्यक्ष” म्हणून काम पाहिले. तसेच पूर्वीच्या काळी शिक्षकांना घर बांधण्यासाठी कोणतीही बँक कर्ज पुरवठा करत नव्हती, तेव्हा साहेबांनी शिक्षकांच्या मदतीने ग्रुपमध्ये जमीन खरेदी करून “ओम नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेची” स्थापना करून 28 शिक्षकांना घरबांधणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून कर्ज मिळवून देऊन घरे बांधून दिले. ते त्या संस्थेचे संस्थापक व चेअरमन आहेत.
शैक्षणिक व सामाजिक कार्याबरोबरच कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता घरातील आपल्या शेतकरी भावाच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी सोबत ठेवून घेऊन त्यांना स्वावलंबी बनविले.
तसेच त्यांची जून – 2022 साली मुखेड येथे “शिक्षण विस्तार अधिकारी” या पदावर त्यांची पदोन्नती झाली. या पदावर असतांना सुध्दा साहेबांनी आपल्या बीटमध्ये अनेक विषयावर वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करून आपल्या बीट मधील व मुखेड तालुक्यातील शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले आहेत.आपल्या बीटमध्ये नवनविन उपक्रमे राबवून आपले बीट सतत फोकसमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी उत्कृष्टपणे प्रशासकाची उत्तम प्रकारे आपली सेवा, भूमिका बजावली आहे.
त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्याच्या सेवा काळामध्ये त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यासोबत ही खूप चांगले संबंध होते, व अधिकाऱ्यांसोबत ही त्यांचे संबंध खूप छान होते, प्रत्येक शिक्षकांच्या अडीअडचणींना ते स्वतः धावून जात, मदत करत आणि त्यांनी कधीच कोणत्याही शिक्षकांवर अन्याय केला नाही किंवा कोणत्याही शिक्षकांचे नुकसान केले नाही,त्यांनी आपल्या कैशल्याचा वापर करुन भायेगाव केंद्रातील शाळा-100टक्के डिजिटल व मुक्रमाबाद केंदातील शाळा-100 टक्के डिजिटल केले आहेत. जागतिक महिला दिनानिमित्य ते आपल्या केंद्रातील व बीटमधील सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करुन त्याचा आदर करत असत.
“रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतू स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो.” त्यातीलच एक श्री विठ्ठलरावजी वडजे साहेब आहेत.
सर्व मित्रमंडळीच्या व कुटूंबाच्या सहकार्याने, अगदी आनंदाने, हसत-खेळत एकूण 37 वर्ष 11 महिने 18 दिवस अखंड ,कोणतेही गालबोट न लागता आपली सेवा पूर्ण करून ते दि.30 जुन 2024 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होनार.
