दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): देगलूर तालुक्यात मध्यंतरी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र, आता पाऊस लांबल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यंदा पाऊस वेळेवर आल्याने काहीच अडचण येणार नाही. अशीच सर्वांची अपेक्षा असतांनाच सध्या
तालुक्यातील बऱ्याच भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस लांबल्याने तालुक्यात २५ हजार हेक्टरवर लागवड झालेल्या सोयाबीन पिकांचे भवितव्य धूसर बनू पाहत आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
तालुक्यात जूनच्या प्रारंभी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागले. याच जोरदार पावसावरच खरीप पेरण्या पूर्ण केल्या. आता महिना होत आला तरी तालुक्याच्या बऱ्याच भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमखास पाऊस येईल, या आशेवरच शेतकरी सध्या आहेत. दररोज आकाशात ढगाळ वातावरण तयार होते. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक बाढली आहे.
शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग , उडीद आदी पिकांची पेरणी केली आहे. काही दिवस पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी कपाशी पिकांमध्ये बैलांच्या साह्याने तिपडेलेले आहे. छोट्या टॅक्टरने रोटा मारून तण काढण्याचा प्रयत्न केला.
तसेच सध्या कपाशी मधील अळे खुरपणीचे काम होत आहे. या खुरपणी मुळे जमिनीतील ओल कमी होत असल्याने पावसाची नितांत गरज आहे.
परंतु पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, पिके उगवून दोन-चार पानावर आली असून, त्यांना आता खतं देण्यासाठी पावसाची गरज आहे. पाऊस नसल्यामुळे पिकांना शेतकऱ्यांना खते टाकणे मुश्किल झाले आहे. शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
येत्या दोन-चार दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास खरीप पेरणीसाठी केलाला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
(खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी पूर्ण केल्यानंतर कोवळी पिके शेतात डोलत असतांनाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिके कोमेजु लागली आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांना पावसाची आवश्यकता आहे. खरीप हंगामातील पेरणी वाया जावु नये . यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.)
