पुणे:भारताविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज होत आहे. त्यासाठी काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सराव व्हावा म्हणून खेळत आहेत.
पण, प्रत्येकाचा सराव चांगला होईलच असे नाही. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या One-Day Cup स्पर्धेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांची हाराकिरी पाहायला मिळाली. २ बाद ५२ अशा अवस्थेतून वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ ५३ धावांवर ऑल आऊट झाला. बिली स्टँकलेकने ३ आणि बीयू वेबस्टरने ६ विकेट्स घेताना तस्मानिया संघाला मजबूत स्थितीत आणले.
आरोन हार्डी आणि डी आर्सी शॉर्ट यांना सुरुवातच चांगली करून देता आली नाही. सहाव्या षटकात टॉम रॉजर्सेने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर हार्डीला ( ७) माघारी पाठले. त्यानंतर शॉर्ट व कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनी डाव सावरण्यासाठी संयमी खेळ दाखवला. दोघांनी ८ षटक खिंड लवढवताना ४२ धावा जोडल्या होत्या, परंतु बेवस्टरने शॉर्टला ( २२) बाद करून मोठा धक्का दिला. जॉश इंग्लिस ( १) व बॅनक्रॉफ्ट ( १४) यांच्या विकेट्सने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले.
त्यानंतर तस्मानियाच्या गोलंदाजांनी जोरदार फास आवळला. कर्णधार अॅश्टन टर्नर, कूपर कोनोली, हिल्टन कार्टराईट, अॅश्टन अॅगर, झाय रिचर्डसन, जोएल पॅरिस हे सहा फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २०.१ षटकांत ५३ धावांवर माघारी परतला.बिलीने ७.१-२-१२-३ अशी स्पेल टाकली. वेबस्टरने कमाल करताना ६ षटकांत १७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आणि २ षटकं निर्धाव टाकली.
तस्मानियाने ४ षटकांत ३३ धावा करून विजयाच्या दिशेने कूच केली होती. सलामीवीर मिचेल ओवेन याने १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २९ धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर कॅलेब जेवेल ३ धावांवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. मॅथ्यू वेडने २१ धावांची नाबाद खेळी करून संघाला ८.३ षटकांत विजय मिळवून दिला. तस्मानियाने ३ बाद ५५ धावा करून बाजी मारली.
