मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माझा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे विधान करून मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याने जवळपास सव्वादोन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळानंतर शिंदेशाहीला पूर्णविराम मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळेच शिवसेनेत शांतता पसरली असल्याचीही माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून अडीच वर्षांपूर्वी भाजपसोबत वेगळी वाट धरली होती. त्यामुळेच शिंदे यांना बक्षीस म्हणून मुख्यमंत्रिपदाची माळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांच्या गळ्यात घातली होती. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत शिंदे यांनीही घोडदौड करत तब्बल सात हजार शासन निर्णय काढत व वेगवेगळ्या समाज घटकावर परिणाम करणारे निर्णय घेत एक स्वतंत्र पक्ष म्हणून शिवसेनेचे लोकसभेला सात खासदार तर विधानसभेला तब्बल ५७ आमदार निवडून आणले.
त्याचबरोबर महायुतीचा लोकप्रिय चेहराही बनण्यामध्येही त्यांनी यश मिळविले. मात्र, भाजपला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तब्बल १३२ जागांची लॉटरी लागल्याने शिंदे यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर राहावे लागणार आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनीही भाजपच्या नेतृत्वालाच मुख्यमंत्रिपदाची पसंती दिल्याने शिवसेनेची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी करण्यात आली. त्यामुळेच शिवसेनेतील अनेक आमदार व कार्यकर्ते नाराज असल्याचे समजत आहे. आम्हाला वापरून फेकून दिले तर नाही ना, असाही प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.
मुख्यमंत्रिपदापासून दूर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पुढील वाटचाल सोपी राहणार नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये शिवसेना कोणाची, चिन्ह कोणाचे, अशा अनेक बाबींवर भाजपचा पाठिंबा घेत वेगवेगळ्या आव्हानांना शिंदे यांना तोंड देता आले. त्याबरोबरच मुख्यमंत्री म्हणून अनेक आमदारांना व कार्यकर्त्यांना सत्तेची लालसा दाखवून जवळ करण्यात शिंदे यांना यश आले होते. त्यामुळेच निवडणुकांमध्ये शिंदे यांना यश मिळाले. मात्र मुख्यमंत्रिपदापासून दूर झाल्यानंतर किती आमदार, कार्यकर्ते सोबत राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शिंदे यांना मुख्यमंत्रिपद का नाही..?
भाजपची शिंदे यांची गरज संपली
राष्ट्रवादीचाही मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या नेतृत्वास पाठिंबा
शिंदे यांच्या शिवसेना वाढीचा भाजपला धोका
उद्धव ठाकरे यांना ‘डॅमेज’ करण्यात भाजपला यश
भाजपचा राज्यभर विस्तार करण्यास केंद्रीय नेतृत्वाचा भर
शिंदे यांच्यावरील संभाव्य परिणाम…
ठाकरेंच्या पक्षाकडून शिंदे यांचा वापर करून फेकून दिल्याचा प्रचार होण्याची शक्यता
मुख्यमंत्री म्हणून जवळ आलेले आमदार कार्यकर्ते दूर जाऊ शकतात
शिवसेनेच्या पक्षवाढीस मर्यादा येणार
भाजपबरोबरची बार्गेनिंग पॉवर कमी होणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दादागिरी वाढणार
भाजपच्या पाठिंबा शिवाय वाटचाल शक्य नसल्याने भाजपचाच अंतिम शब्द मानावा लागणार
