महायुती सरकार स्थापन होऊन 48 तास होत नाही तोच महायुतीमध्ये मतभिन्नता असल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबाबत (Shaktipeeth Expressway) महायुतीत मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हायवे कोल्हापुरातून होऊ देणार नाही, अशी भूमिका हसन मुश्रीफांनी घेतली आहे. तर विरोध नाही तिथून हायवे जाणार, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी कालावधीत महायुतीतच महामार्गावरुन खटके उडण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यात रद्द झाला आहे. त्याची अधिसूचना देखील देखील निघाली. सांगलीतील शेतकऱ्यांना महामार्ग हवा आहे. सांगलीच्या पुढे कोल्हापूरमार्गे गोव्याला कसे जायचे ते सरकार ठरवेल. परंतु शक्तिपीठ रस्ता कोल्हापूरातून रद्द झाला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री..?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्णपणे समर्थन आहे. सगळेच शेतकरी आम्हाला सांगतात की आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा. सांगली जिल्ह्यातील भागात त्याला समर्थन आहे. तर कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होते तिथे विरोध होत आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे, असा आहे की जिथपर्यंत विरोध आहे तिथपर्यंत काही काम करायचे आणि जिथे विरोध आहे तिथे सर्वांशी चर्चा करून काही मार्ग काढता येईल का हे पाहणार आहे.कारण शेतकऱ्यांना नाराज करून त्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या जमिनी बळकवण्याची आमची मानसिकता नाही..
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. याचा विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला.महामार्गाबाबतची अधिसूचना रद्द करून 15 ऑक्टोबरला राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कसा असणार आहे शक्तीपीठ महामार्ग?
शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडून 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बाय रोड 18 तासांचा कालावधी लागतो. मात्र, शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांचे होणार आहे. हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे देण्यात आलं आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील.
