महापालिका निवडणुकीआधी घेतला मोठा निर्णय..!
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. तर, विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.
काही नेत्यांचा जेमतेम काही हजारांच्या मताधिक्याने विजय झाला. मतदारांनी दिलेल्या इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनावर घेतला असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले. त्यातही बहुतांशी आमदार मुंबईतील आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत काही हजार मतांशी आघाडी मिळाली होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर घटले.
आदित्य ठाकरेंवर आरोप…
विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. प्रचारा दरम्यान आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लोकांना ते भेटत नसल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांनी लोकांना भेटणं अपेक्षित असताना त्यांनी आपल्या प्रतिनिधींवर, स्थानिक पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
आदित्य ठाकरे यांनी मतदारांचा इशारा मनावर घेतला?
आदित्य ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत जवळपास साडे आठ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला. चांगल्या मताधिक्याची अपेक्षा असताना आदित्य यांना इतके कमी मताधिक्य मिळाल्याने शिवसेना नेतृत्त्वाने ही बाब मनावर घेतली. आता, निवडणूक निकालानंतर आता आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. निवडून आल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी मतदारांची भेट घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे आज वरळीतील मतदारांची भेट घेणार आहे.
असा असणार आदित्य ठाकरेंचा दौरा…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे हे वरळी कोळीवाड्यातील गोल्फादेवी मंदिर आणि श्री शंकर मंदिरात दर्शन घेणार आहे. त्यानंतर आदित्य हे शिवसेना ठाकरे गटाची शाखा क्रमांक 193, भेट आणि संवाद, शाखा क्रमांक 195, वरळी बीडीडी चाळींना भेट आणि स्थानिकांसोबत संवाद साधणार आहेत. आदित्य यांचा दौरा हे सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू करणार आहेत.
