विधानसभा निवडणूक ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या कालावधीत 85 वर्षांचे शरद पवार कमबॅक करणार की नाही?, याची पवारनिष्ठ माध्यमांनी चर्चा सुरू केली, पण 55 व्या वर्षी खासदार सुप्रिया सुळे उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी घेऊन पक्ष वाढविणार की नाही?, याच्या चर्चेचे सूतोवाच देखील कुणी करताना दिसत नाही.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या 60 वर्षांच्या राजकीय आयुष्यातला सर्वांत मोठा दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवार आता काय करणार?, त्यांच्यापुढे नेमकी कोणती राजकीय आव्हाने आहेत?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स कसा राहील?, शरद पवार नजीकच्या किंवा दूरच्या भविष्यकाळात आपली उरलेली राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करणार का?, तसे केले, तर पवारांना काय फायदा होणार आणि तसे केले नाही, तर पवारांना कोणता फायदा किंवा तोटा होणार?? या प्रश्नांवर “पवारनिष्ठ” मराठी माध्यमांनी उहापोह सुरू केला. त्यांचे वेगवेगळे पैलू तपासले. त्यातले धोके आणि शक्यता यावर आपापल्या वकुबानुसार विश्लेषण केले. या चर्चेचे निष्कर्ष अर्थातच पवारांच्या सध्याच्या राजकीय अवस्थेनुसार अधांतरीच राहिले. कारण पवारांचे राजकारण “उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक”, असेच राहिल्याचा निष्कर्ष काढण्याची आणि तो जाहीरपणे सांगण्याची “पवारनिष्ठ” माध्यमांची अजूनही हिंमत होत नाही. पण म्हणून ते काही सत्य लपवू शकत नाहीत.
असे असून देखील “पवारनिष्ठ” माध्यमांपैकी कोणीही अजून वयाच्या 55 व्या वर्षी सुप्रिया सुळे उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी घेणार का आणि त्या तडफेने काम करून सुरुवातीला आपला पक्ष टिकवून, नंतर तो वाढवणार का?, असे सवाल देखील करण्याच्या स्थितीत दिसत नाहीत.
सुप्रिया सुळे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आगेमागे “दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी” अशी एक काव्यमय पोस्ट सोशल मीडिया अकाउंट वर केली होती. ती पवारनिष्ठ माध्यमांनी गाजवली होती, पण या दमलेल्या बापाचा पक्ष विधानसभा निवडणुकीत गाळात गेल्यानंतर तो गाळातून बाहेर काढण्यासाठी या बापाची लेक पुढे सरसावणार का? आणि पुढे सरसावलीच, तर ती पक्ष सावरू शकणार का..?, तेवढी या लेकीची क्षमता निर्माण तरी झाली आहे का..?, हे सवाल कळीचे असून देखील ते “पवारनिष्ठ” माध्यमे विचारत नाहीत किंवा त्या विषयाच्या चर्चेच्या कडेने सुद्धा जात नाहीत.
पॉलिटिकल रेलेव्हन्स..!
वास्तविक वयाच्या 85 व्या वर्षी शरद पवार कमबॅक करणार का?, या विषयावर चर्चा होणे, हे पवारांच्या राजकारणाचे यश मानले पाहिजे. कारण कोणत्याही कारणाने का होईना किंवा आपल्या मराठी माध्यमांच्या वरच्या पकडीने का होईना, पवार या उतारवयात “पॉलिटिकली रेलेव्हन्ट” राहिले. पण शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांचे स्वतंत्रपणे राजकीय भवितव्य काय..?, त्यांची क्षमता किती..?, त्या नेमके कुठले पाऊल उचलणार..?, त्या आपल्या वडिलांचा राजकीय वारसा कसा पुढे चालवणार..?, त्यांच्यापुढे नेमकी कुठली आव्हाने असतील आणि त्या ती आव्हाने कशा पेलतील..?, या प्रश्नांची चर्चा देखील पवारनिष्ठ मराठी माध्यमांमध्ये नसणे हे सुप्रिया सुळे वयाच्या 55 वर्षी देखील आपला “पॉलिटिकल रेलेव्हन्स” निर्माण करू न शकल्याचे लक्षण आहे. पण हे सत्य हे सांगण्याची “पवारनिष्ठ” मराठी माध्यमांची हिंमत नाही.
