बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करण्याच्या मागणीसाठी मोर्चा देखील काढण्यात आला.
तर वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी सीआयडीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. तर, दुसरीकडे आता वाल्मिक कराडच्या समर्थनात आंदोलन सुरू झाले आहे.
गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला आहे. वाल्मिक कराडवर खंडणीसह इतर गु्न्हे दाखल आहेत. पोलिसांनी वाल्मिक कराडला अटक करण्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्यासह इतर आरोपींची बँक खातीदेखील गोठवली आहेत. वाल्मिक कराडबद्दल असंतोष दिसून येत असताना दुसरीकडे आता वाल्मिक कराडच्या बाजूने आंदोलनं सुरू झाली आहेत.
वाल्मिक कराडच्या पाठिंब्यासाठी आंदोलन…
वाल्मिक कराडवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप कराड समर्थकांकडून करण्यात येत आहे. वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांच्यावतीने हे उपोषण करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हे समाजसेवक असून त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी प्रामुख्याने या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कुठं गेला वाल्मिक कराड?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
