तरुणाची ७ लाख ३० हजार रुपयात फसवणूक
ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मोबाईलवर संपर्क करून वेगवेगळे आमिष दाखवत फसवणूक करण्यात येत असते. त्यानुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून संबंधितास मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
हे अँप डाउनलोड करताच बँक खात्यातील ७ लाख ३० हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक करण्यात आली.
जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात मोहम्मद इमरान हानिफ तेली या तरुणाची फसवणूक झाली आहे. मोहम्मद हा मार्केटींगचे काम करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान २ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एस.एम. आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने मोहम्मद तेली यांच्याशी व्हाट्सअँप आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना स्टॉक मार्केटची माहिती देऊन त्या संबंधिचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
अँप डाउनलोड करताच रक्कम काढली
मोहम्मद याला स्टॉक मार्केटशी संबंधित अँप डाऊनलोड करायला सांगितल्याने प्ले स्टोर वरून सदरचे अँप डाऊनलोड केले. अँप डाऊनलोड करताच या तरूणाच्या बँक खात्यातून वेळोवेळी तब्बल ७ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सायबर पोलिसात तक्रार
दरम्यान या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून १ फेब्रुवारीला जळगाव सायबर पोलीस ठाण्यात एस.एम. आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करीत आहे. नागरिकांनी ऑनलाइन फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
