पतंजली ऑरेंज ज्यूस प्लांट सुरू झाल्यानंतर बदलतंय चित्र !
योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या आशियात खंडातील सर्वात मोठ्या फूड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन नुकतेच 9 मार्च रोजी नागपुरातील मिहान सेझ मध्ये पार पडले आहे.
पतंजली उद्योग समूहाकडून संत्र्यावर प्रक्रिया करणारा ‘ज्यूस प्लांट’ देखील या पतंजली फूड पार्कमध्ये सुरू झाला आहे.
दरम्यान, रोज 800 टन संत्र्याची आवश्यकता या ज्यूस प्लांटला असल्यामुळे अवघ्या दोन दिवसातच शेतकऱ्यांना ‘बी’ आणि ‘सी’ ग्रेडच्या संत्र्याला 22 रु प्रति किलोचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुळात ‘बी’आणि ‘सी’ ग्रेडच्या संत्र्याला बाजारात डागाळलेला किंवा लहान आकाराचा संत्रा म्हणून कोणीही घेत नव्हतं, त्याच संत्र्याला आता 22 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना हक्काचं अतिरिक्त उत्पन्न मिळू लागलं आहे.
पतंजलीच्या ऑरेंज ज्यूस प्लांटमुळे शेतकऱ्यांना आले अच्छे दिन
दरवर्षी विदर्भातील प्रत्येक संत्रा बागेत किमान 15 ते 20 टक्के संत्रे एक तर फळगळतीमुळे खाली पडतात आणि त्यांच्या सालीवर डाग लागतात, किंवा या संत्र्यांचा आकार लहान असल्यामुळे त्यांना बाजारात चांगला भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना हे 15 ते 20% संत्रे कवडीमोल दरात विकावे लागायचे किंवा फेकून द्यावे लागायचे. मात्र आता ज्यूस प्लांटमध्ये त्याच संत्र्याला 18 ते 22 रु प्रति किलो असा चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची नवी संधी चालून आली आहे. हे प्रकल्प अल्पकालीन ठरू नये याची संबंधित उद्योग समूह आणि सरकारने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा वैदर्भीय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संत्र्याच्या सालीचाही वापर
पतंजलीच्या या प्लांटचा आणखी एक यूएसपी म्हणजे बाय-प्रोटेक्ट वाया जाऊ दिले जात नाहीत. संत्र्याचा रस काढल्यानंतर त्याची साल पूर्णपणे वापरली जाते. याच्या सालीमध्ये कोल्ड प्रेस ऑइल (CPO) असते ज्याला बाजारात मोठी मागणी आहे. याशिवाय नागपूर ऑरेंज बर्फीमध्ये कच्चा माल म्हणून वापरण्यात येणारा प्रीमियम पल्पही पतंजली संत्र्यांमधून काढला जात आहे. यासोबतच तेलावर आधारित सुगंध आणि पाण्यावर आधारित सुगंधाचे सारही काढले जात आहे. संत्र्याच्या सालीची पावडर सौंदर्यप्रसाधने आणि इतर किमतीची उत्पादने बनवण्यासाठी वापरली जाते. त्यासाठी संत्र्याची साल सुकवूनही पावडर बनवली जाते.
