पोलिसांनी थेट प्रयागराजमधून उचललं…
भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले अर्थात खोक्या याला बीड पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराजमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे
बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च किंवा 23 मार्चला त्याला बीडला आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.
सतीश भोसले हा बीडमधील गुंड असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून धस यांच्यासोबतचे त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. धस यांनीही तो आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले होते. याच ‘खोक्या’ भाईचा काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे मारहाण करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच संतापाची लाट उसळली होती.
या व्हिडीओनंतर त्याचे माज करतानाचे इतरही काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. गाडीमध्ये पैशांचे बंड फेकतानाचे, भर मिरवणुकीत पैसे उधळण्याचे, हेलिकॉप्टरमधील व्हिडीओ व्हायरल झाले होते. या सगळ्या व्हिडीओंनंतर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी सुरू होती. त्याच दरम्यान, त्याचावर ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणीचा दुसरा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी खोक्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गांजा सापडला होता. त्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वनविभागाचीही कारवाई –
सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’च्या घरी वनविभागानेही धाड टाकली होती. यात त्याच्याकडे विविध हत्यारे आणि जंगली प्राण्यांना मारल्याचे पुरावे आढळून आले होते. हरीण, मोर अशा विविध प्राण्यांना मारून खाल्ल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. त्यामुळे वनविभागनेही त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर कारवाई होणार आहे.
