न्यायपालिकेला बसला हादरा…
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून नोटांचा ढीग सापडल्याने संपूर्ण न्यायपालिकेलाच धक्का बसला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही अत्यंत गंभीर दखल घेतली आहे
वर्मा यांची बदली दिल्लीतून इलाहाबाद हायकोर्टात करण्यात आली आहे. आता याही पुढे जाऊन त्यांचा राजीनामा घेण्याचा विचार सुरू झाला आहे. तसेच या सर्व प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून चौकशीही सुरू केली जाऊ शकते.
खरंतर जस्टीस यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्याला आग लागली होती. त्यावेळी वर्मा शहरातून बाहेर होते. त्यांच्या कुटुंबियांनी तत्काळ अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी बोलावून घेतले. मोठ्या प्रयत्नांनंतर अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. पण याच वेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बंगल्यात नोटांचा ढीगच सापडला. यानंतर मोठी खळबळ उडाली. बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ा यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कॉलेजियमची एक बैठक घेतली. या बैठकीतच यशवंत वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सुरुवातीची कार्यवाही आहे. यानंतर सुप्रीम कोर्ट या प्रकरणाची वेगळी चौकशी देखील करू शकते. या चौकशीत जर न्या. वर्मा स्वतःला वाचवू शकले नाहीत तर त्यांना राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकते. राजीनामा दिला नाही तर संसदेत महाभियोग आणून त्यांना पदावरून हटवण्यात येऊ शकते. यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. या प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो.
न्या. यशवंत वर्मा कोण
न्या. यशवंत वर्मा यांचा जन्म 6 जानेवारी 1969 रोजी इलाहाबाद शहरात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हंसराज महाविद्यालयातून बीकॉम (ऑनर्स) पूर्ण केले. यानंतर मध्य प्रदेशातील रिवा विद्यापीठातून एलएलबी केले. 8 ऑगस्ट 1992 रोज वर्मा अॅडव्होकेट म्हणून इनरोल झाले. दीर्घ काळ वकिली केल्यानंतर त्यांनी कायदा, श्रम आणि औद्योगिक कायदे, कॉर्पोरेट कायदे यांसह अन्य संबंधित क्षेत्रात प्राविण्य मिळवले.
यानंतर सन 2006 पासून इलाहाबाद हायकोर्टात विशेष वकील म्हणून त्यांनी कामकाजास सुरुवात केली. सन 2012 ते 2013 दरम्यान वर्मा उत्तर प्रदेशचे चीफ स्टँडिंग काउंसल पदावर राहिले होते. यानंतर सीनियर अॅडव्होकेट बनले. यानंतर 13 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांना इलाहाबाद हायकोर्टात अॅडिशनल जज म्हणून नियुक्त करण्यात आले. 1 फेब्रुवारी 2016 म्हणजेच दोन वर्षाच्या आतच त्यांना कायम म्हणून पदोन्नती देण्यात आली. 11 ऑक्टोबर 2021 न्या. यशवंत वर्मा यांची बदली दिल्ली उच्च न्यायालयात झाली होती.
