दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
एकाच ठिकाणी शेती, फलोद्यान आणि वनशेती यांचे योग्य मिश्रण केल्यास पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषि वानिकी पद्धतीचा अवलंब करावा,” असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत कोसबाड येथे आयोजित कृषि वानिकी कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर रेंजर प्रमोद ठाकर, वनक्षेत्रपाल सागर आरडेकर उपस्थित होते.
कार्यशाळेतील आपल्या मार्गदर्शनात डॉ. जाधव म्हणाले, कृषि वानिकीमुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पाण्याची धारणक्षमता सुधारते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे जनावरांसाठी चारा आणि इंधनासाठी लाकूड सहज उपलब्ध होते म्हणून शाश्वत उत्पन्नासाठी ही एक आदर्श शेती पद्धत आहे. शेतकऱ्यांनी या आधुनिक संकल्पनेचा अवलंब करून स्वतःच्या उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी रेंजर प्रमोद ठाकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यांनी वन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. ठाणे सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी रामेश्वरी बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृषि वानिकी पद्धतीविषयी सखोल माहिती घेतली. शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक उत्पन्न वाढीसाठी कृषि वानिकी उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.
