दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर)
विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या उपविधान समिती विविध विषयांवर सखोल चर्चा करून शासनाच्या कार्यपद्धतीवर देखरेख ठेवण्याचे काम करतात.
या समितीवर देगलूर बिलोली विधानसभेचे आ.जितेश अंतापूरकर यांची निवड झाली आहे.
दरम्याण उपविधान समित्यांचे मुख्य उद्देश विशिष्ट विधेयके, धोरणे आणि प्रशासकीय बाबींचा तपशीलवार अभ्यास करणे, तसेच सरकारच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणे हे आहेत. या समित्या अनियमितता शोधून त्यावर उपाय सुचवतात आणि सुधारणा सुचवण्यासाठी शिफारसी देतात.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, उपविधान समित्यांचे कार्य व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विधानमंडळात मोठ्या समित्यांच्या तुलनेत या लहान असल्या तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो.
विशेषतः, कोणत्याही विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत अधिक तपशीलवार विचार करण्यासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत उपविधान समित्या निर्णय प्रक्रियेसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरतात.
दरम्याण या अतिशय महत्वपुर्ण समितीवर आ.जितेश अंतापूरकर यांची निवड झाल्याबद्दल राज्यभरातील कार्यकर्त्यांकडुन आ. अंतापूरकरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
