इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; पालकमंत्री कारखाना निवडणुकीत व्यस्त…
पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. या दुर्घटनेत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. मात्र पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी किंवा जखमींची भेट घेण्यासाठी फिरकले देखील नाही.
अजित पवार कुठे आहेत? अशी विचारणा अनेकांकडून आता केली जात आहे. अजित पवार सध्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचं दिसतून येत आहे. लोकांसाठी लोकांमध्ये राहून काम करणारा नेता अशी अजित पवारांची ओळख सांगितलं जाते. कधी-कधी अजित पवार स्वत: देखील या गोष्टींचा उल्लेख करतात. मात्र अजित पवारांनी आता आपल्या कामाची पद्धत बदलली की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कारण इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याची घटना घडलेली असताना अजित पवार आज बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दुपारनंतर चार प्रचार सभा घेणार आहेत. मात्र काही तासांच्या अंतरावर असलेल्या कुंडमळा पूल दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन अजित पवार जखमीची भेट घेणार की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवार काल बारामतीमध्ये होते. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी काही बैठका देखील घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र अजित पवारांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांची असंवेदनशील नेते म्हणून ओळख तयार होत आहे.
अजित पवार जबाबदारी घेणार का?
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा अजित पवारांना गर्व आणि अहंकार आहे. अजित पवार पालकमंत्री म्हणून इंद्रायणी पूल दुर्घटनेची जबाबदारी घेणार का की झटकून टाकणार? त्यांना सगळंच माहित असतं. मग त्यांना हा पूल जुना झाला हे माहीत नव्हत का? एक-दोन कोटींचा पूल पालकमंत्री उभा करू शकले नाही. लहानसहान कामात पालकमंत्री झोपलेले असतात, मात्र मोठ्या ठेकेदारांची कामे, बिल्डरांची कामे यासाठी पालकमंत्री जागे असतात. काल बळी गेले याला जबाबदार कोण? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
