2 मे 2023. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडत होता.
यात शरद पवार यांनी भाषण करताना अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. कार्यकर्ते, पदाधिकारी अक्षरशः रडत होते. आमदार-खासदारही भावनाविवश झाले होते. शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा, यासाठी सर्व जण अडून बसले होते.
हे शरद पवार यांचे एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच होते. पक्षात आजही आपणच किंग आहे, असा संदेश त्यांनी त्यातून देण्याचा प्रयत्न केला. पुढील काही दिवसांत शरद पवार यांनी राजीनामा परत घेतला. बंड करू इच्छिाणाऱ्यांना त्यांनी याद्वारे मोठा झटका दिला होता. याच कार्यक्रमात शरद पवार यांच्या शेजारी बसलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही अश्रू अनावर झाले होते. आता जवळपास दोन वर्षांनंतर तसाच डाव जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात खेळला आहे.
अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटील यांनी आता तरुण चेहऱ्याला संधी द्या, असे म्हणत राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली आहे. पण जयंत पाटील यांना राजीनामा द्यायचाच होता तर तो त्यांनी स्वतःहून दिला असता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी पर्याय शोधलाच असता, पण त्यांनी जाहीररीत्या राजीनामा घ्या आणि दुसरा पर्याय शोधा असे म्हटले. यातून बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या आहेत. सध्या जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामागे कारणेही तशीच आहेत.
अजितदादा पवार हे काका शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले होते. पक्षाचे बहुतांश आमदार, बडे नेते अजितदादांसोबत गेले आहेत. त्यामुळे पक्षसंघटनेवर पकड ठेवू शकेल, असा जयंत पाटील यांच्या क्षमतेचा अन्य नेता शरद पवार यांच्याकडे नाही. जयंत पाटील हे अत्यंत शांत, संयमी नेते आहेत. सध्याच्या राजकीय गोंगाटात, उथळ नेत्यांच्या भाऊगर्दीत ते ठळकपणे उठून दिसतात. त्यांच्या बोलण्यात आततायीपणा, आक्रस्ताळेपणा अजिबात नसतो.
पक्षसंघटना, विधीमंडळातील अनुभव, मंत्री म्हणून असलेला मोठा अनुभव, वरिष्ठ वर्तुळातील त्यांची उठबस आणि प्रशासनातील खाचाखोचा माहित असणारा पाटील यांच्यासारखा नेता शरद पवार यांच्याकडे नाही. अशी वैशिष्ट्ये असलेला नेता कोणत्या पक्षाला नको असतो? भाजपलाही ते हवेच आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सातत्याने होत असते. अशा परिस्थितीत शरद पवार हे जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतील असे वाटत नाही.
प्रदेशाध्यक्षपदी राहिल्यास मोठ्या जबाबदारीचे पद असल्यामुळे जयंत पाटील यांच्यावर आपोआप नैतिक दबाव राहील आणि ते पक्ष सोडण्याचा विचार सहजासहजी करू शकणार नाहीत. विधानसभेच्या या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या पदाची गरज आहेच. प्रदेशाध्यक्षपदाच्या रूपाने संघटनात्मक पातळीवरील मोठे पद त्यांच्याकडे आहे. शिवाय, ते एआय समितीचे अध्यक्षही आहेत. या समितीला 500 कोटींचे बजेट आहे.
प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मोकळे करा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करून जयंत पाटलांनी काय साध्य केले, असा प्रश्न आता पडू शकतो. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मला मोकळे करा, तरुण चेहऱ्याला संधी द्या असे म्हणत जयंत पाटील यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे या वादावर तूर्त पडदा पडण्याची शक्यता आहे. भावनिक आवाहन करत जयंत पाटील यांनी सहानुभूती मिळवली आहे आणि रोहित पवार यांच्यापेक्षा ते वरचढही ठरले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून प्रदेशाध्यपद पवार कुटुंबीयांकडे एकदाही गेलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. या इतिहासाचा जयंत पाटील यांनी अत्यंत खुबीने वापर केला आहे. ”शेवटी पक्ष शरद पवार साहेबांचा आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा,” ही भाषणातील जयंत पाटलांची दोन वाक्ये धोरणी, मुरब्बी राजकीय नेत्याला शोभेल अशीच आहेत. वस्ताद एक डाव शिल्लक ठेवत असतो, तो शिष्याला सर्व डाव शिकवत नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी फुटिरांना डिवचले होते. जयंत पाटलांच्या बाबतीतही वस्तादाने एखादा डाव शिल्लक ठेवला आहे का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
याबाबत राजकीय अभ्यासक अशोक पवार सांगतात, जयंत पाटील यांनी भावनिक आवाहन करून आपले स्थान बळकट केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षाने उपमुख्यमंत्रिपद दिले होते. त्यावेळी फडणवीस यांनी पक्षकार्यासाठी मला मुक्त करा, असे म्हणत आपले स्थान मजबूत केले होते. जयंत पाटील यांनीही तसेच केले आहे. पाटील यांचा मोठा राजकीय कालखंड सत्तेत गेला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे, ती जयंत पाटलांसाठीच आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे शरद पवार हे जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करतील, असे वाटत नाही.
