थेट वागण्याची पद्धतच बदलावी लागणार !
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा आता भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पातळीवर मोठा विरोध असतानाही भाजपच्या वरिष्ठांनी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना पक्षात घेतलं.
राज्याचे मुख्यमंत्री व भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीनचीट दिली आहे. पण त्याचवेळेला फडणवीस यांनी त्यांना यापुढे तुम्हाला आता भाजपच्या नितीनियमाप्रमाणे वागावे लागेल असं निक्षून सांगितलं आहे.
भाजपनेच बडगुजर यांचे मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत असलेलं कनेक्शन समोर आणलं होतं. मात्र त्याच बडगुजर यांना भाजपने प्रवेश दिल्याने टीका होत आहे. मात्र याप्रकरणात बडगुजर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कोणतीही कारवाई झालेली नसून ते निर्दोष असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल, ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती नियमांनी वागले पाहिजे असा सल्ला फडणवीस यांनी बडगुजर यांना क्लीन चीट देताना दिला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर यांना आता आपल्या राजकीय शैलीत मोठा बदल करावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप पक्षात काम करताना थेट, आक्रमक आणि कोणालाही न जुमानणारी त्यांची कार्यशैली आता मर्यादित ठेवावी लागेल. भाजपमध्ये संघटनात्मक शिस्त आणि सामूहिक निर्णयप्रक्रिया यांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे बडगुजर यांना आता गटशिस्त, वरिष्ठांचे आदेश आणि पक्षनिष्ठा यांचे भान ठेवूनच पुढची वाटचाल करावी लागणार आहे असं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
बडगुजर यांना आता नव्या घरात घरोबा करताना काही गोष्टींशी जुळवून घ्यावं लागणार आहे. बडगुजर यांनी याआधी स्थानिक पातळीवर स्वतःचा प्रभाव निर्माण करताना ज्या पद्धतीने राजकारण केलं त्या पद्धतीत आता बदल करावा लागेल. भाजप आमदार सीमा हिरे यांच्यासोबत त्यांचा वाद आहे. विधानसभा निवडणुकीवेळेला भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांचे वाद झाले होते. मात्र बडगुजर यांना आता आपल्या आक्रमक स्वभावाशी देखील जुळवून घ्यावं लागणार आहे, अन्यथा भाजपमध्ये टिकणं अवघड होईल, असंही निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलं आहे.
त्यामुळे गिरीश महाजन यांच्या शिफारशीनंतर बडगुजर यांचा पक्षप्रवेश पार पडला असला, तरी भाजपच्या नियमांच्या चौकटीत राहणं त्यांच्यापुढे मोठं आव्हान असेल. बडगुजर हे फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षात कितपत नियम व शिस्त पाळतात, सगळ्यांशी जुळवून घेतात हे पाहणं पुढील काळात महत्त्वाचं ठरणार आहे.
