नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला…
यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यापेक्षा त्यांच्या विचारांचं पालन करा,’ असा स्पष्ट इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ‘बळीराजा सहकार बचाव’ पॅनेलच्या सभेत त्या बोलत होत्या.
सुळे यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरण मांडलं. ते म्हणायचे, ‘तुम्हीही सत्तेत राहा.’ पण आज तसे होताना दिसत नाही. निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. मात्र, यशवंतराव चव्हाण यांचं केवळ नाव वापरणं पुरेसं नाही. त्यांचे विचार आत्मसात करावेत. याचा आत्मचिंतन करा, अशा शब्दांत सुळे यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
पीडीसीसी बँकेबाबत सुद्धा सुळे यांनी जोरदार प्रश्न उपस्थित केले. “इतकी चांगली बँक रात्री ११ वाजता उघडी का? सीसीटीव्ही फुटेज कुठं आहे? ही बँक कुणाची मक्तेदारी नाही. नियम तुम्हीच बनवायचे आणि मोडायचे, याला लोकशाही नाही तर दडपशाही म्हणतात, असा घणाघात त्यांनी केला.
“माळेगावच्या सभासदांची नावं तिथं का आहेत? माझंही नाव असेल. पारदर्शक चौकशी हवी. एसआयटी कमिटी नेमावी. मोदी पारदर्शक व्यवहाराच्या गप्पा मारतात, मग पीडीसीसी बँकेवरच प्रश्न का निर्माण होतो? असा सवाल करत सुळे यांनी चौकशीची मागणी केली.
