बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे.
त्यात आता बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे, ज्याचे परिणाम निश्चितच आगामी निवडणुकीत दिसतील. तर नितीशकुमारांच्या या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधी पक्षांचं मात्र टेन्शन वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मोठा डाव टाकला आहे. त्यांनी बिहारमधील वृद्ध, अपंग आणि विधवा महिलांना देण्यात येणारी मासिक पेन्शन वाढवण्याची घोषणा केली आहे. मासिक पेन्शन ४०० रुपयांवरून ११०० रुपये करणार असल्याचे जाहीर केले. हा निर्णय पुढील महिन्यापासूनच म्हणजेच जुलैपासून लागू होणार आहे. तर या निर्णयाचा फायदा राज्यातील सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत जवळपास एक कोटी १० लाख लाभार्थ्यांना होणार आहे.
मासिक पेन्शन वाढीचा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की, सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत आता सर्व वृद्ध, अपंग आणि विधवा महिलांना दरमहा ४०० रुपयांऐवजी ११०० रुपये पेन्शन मिळेल. जुलै महिन्यापासून सर्व लाभार्थींना वाढीव दराने पेन्शन मिळेल.
याशिवाय, ही रक्कम प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला सर्व लाभार्थींच्या थेट खात्यात पाठवली जाईल, हे सुनिश्चित केले जाईल. यामुळे १ कोटी ९ लाख ६९ हजार २५५ लाभार्थींना खूप मदत होईल. तसेच वृद्ध हे समाजाचा एक मौल्यवान भाग आहेत आणि त्यांना सन्माननीय जीवन मिळवून देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. राज्य सरकार या दिशेने आपले प्रयत्न सुरू ठेवेल.
सर्व २४३ जागा लढविण्याची घोषणा केलेली आहे. आगामी काळात पक्षाचे वरिष्ठ नेते बिहारमधील अनेक शहरांमध्ये पदयात्राही काढणार आहेत.
