दहा वर्षातील विक्रमी पावसाची नोंद; गंगापूर धरण किती भरलं ?
नाशिक शहर व जिल्ह्यात यंदाच्या जून महिन्यात विक्रमी पावसाची (Rain) नोंद झाली असून, तब्बल दहा वर्षांनंतर प्रथमच शहरात जूनमध्ये 315 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सलग सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर आणि पाणलोट क्षेत्रातील धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आहे.
परिणामी, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सध्या 65 टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे सुमारे 6,000 क्यूसेस वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात पाणीप्रवाह वाढला असून, नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर दारणा, कडवा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विशेषतः नांदूरमध्यमेश्वर धरणातून सध्या तब्बल 15,000 क्यूसेस वेगाने विसर्ग सुरू आहे.
धरणसाठ्यात आठ दिवसांत 13 टक्क्यांनी वाढ
शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात आठ दिवसांत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गंगापूर, दारणा, कादवा धरणांसह नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, मागील सोमवारी 25 टक्क्यांवर असलेल्या जिल्ह्यातील धरण समूहातील साठ्यात आठ दिवसांत 13 टक्क्यांनी वाढ होऊन साठा 38 टक्क्यांवर पोहोचला आहे.
गोदावरीला यंदाच्या हंगामातील दुसरा पूर
गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील दुसरा पूर जूनमध्येच आला आहे. दरवर्षी जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गोदावरीला पूर येतो. मात्र, यंदा मान्सून नियोजित वेळेत दाखल झाल्याने 20 जूनला गोदावरीला पहिला पूर आला होता, तर सोमवारी (दि. २३) पुन्हा पूर आला आहे. गंगापूर धरणातून सोमवारी दुपारी 2 वाजता 6,160 क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होऊन पूर आला आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ होत असल्याने पाटबंधारे विभागाकडून गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. नदीला पूर आल्याने रामकुंडावरील व्यावसायिकांचे मात्र हाल झाले आहेत. देशभरातून रामकुंडावर धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र गोदाकाठापासून दूर धार्मिक विधी करावे लागत असल्याचे चित्र होते.
जायकवाडी धरणाला होणार फायदा
नाशिक जिल्ह्यातील मोठ्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. सध्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या दृष्टीनेही ही पावसाची वाढ दिलासादायक मानली जात आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
