राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या 5 जुलैला याविरोधात ते मोर्चाही काढणार आहेत.
सर्व मराठीप्रेमींना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता भाजपमधूनही या मोर्चाला पाठिंबा मिळू लागला आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील मराठीप्रेमींनी हिंदी सक्तीविरोधात उभे राहावे, असे आवाहन गुरूवारी केले होते. राज ठाकरेंची भूमिकाही तीच आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी रविराज बोटले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे त्यांच्या मोबाईलचे स्टेटस सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या स्टेट्सचा स्क्रीनशॉट अनेकांनी शेअर करत बोटले यांचे स्वागत केले आहे.
कोण आहेत रविराज बोटले?
रविराज बोटले हे पेशाने वकील आहेत. त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार ते भाजपच्या दिवा शीळ मंडल कायदा सेलचे संयोजक आहे. या पदाचाच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात पहिलीपासून हिंदी लादण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षा – दिवा शिळ मंडळ कायदा सेल संयोजक या पदाचा राजीनामा देत आहे.
राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला एक मराठी माणूस म्हणून माझा जाहीर पाठिंबा असून, 5 जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चात मी सहभागी होईन, असे बोटले यांनी म्हटले आहे. बोटले यांचा नावाचा हा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत असून अनेकांकडून शेअर केला जात आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे हेही सहभागी होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यामुळे या मोर्चाला आता वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच मोर्चात एकत्र येणार असल्याने ते निवडणुकीतही युती करणार का, या चर्चांना उधाण आले आहे.
