ठाकरे बंधूंच्या आवाहनावर शरद पवारांची ही भूमिका !
महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्रावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघेही राज्य सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपली ठाकरे बंधूंचे मोर्चे आणि हिंदी भाषा सक्तीवर आपली भूमिका कोल्हापूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत मांडली.
प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती योग्य नाही. पहिली ते चौथी हिंदी सक्ती करणे योग्य नाही. पाचवीनंतर हिंदी शिकवण्यास हरकत नाही. मातृभाषा ही महत्त्वाची आहे. असे ते म्हणाले.
पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. पण पाचवीनंतर हिंदी येणे त्या विद्यार्थ्याच्या हितासाठी आवश्यक आहे. देशात 55 टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही जी एवढे लोक बोलतात. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. पण पहिली ते चौथी या वयोगटाच्या डोक्यावर आत्ताच नवीन भाषा लादणे योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे. अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
गुरुवारी उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांनी स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात काढल्या जाणाऱ्या एका मोर्चाला पाठिंबा दिला तर राज ठाकरेंनी कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय पूर्णपणे जनतेचा व सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा काढण्याचं आवाहन केलं. तसेच, नेहमी राजकीय लोक मराठीच्या मुद्द्यावर बोलत असतात, आता या मोर्चात कोण कोण सहभागी होतंय ते मला बघायचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. यासंदर्भात आज कोल्हापुरात शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर भूमिका मांडली. पुढे ते म्हणाले की, दोन्ही ठाकरेंची विधाने मी वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचे म्हणणे समजून घेणार आहे. त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले आहेत. त्यांनी हेही जाहीर केले की त्यात विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे. त्यासाठी त्यांचे नेमके घोरण समजून घ्यावे लागेल, असे शरद पवार म्हणाले. कोणीही सांगतो तुम्ही यात सहभागी व्हा, अशी भूमिका घेता येणार नाही. पण त्यांचा मुद्दा जर महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणे आणि मग त्यावर योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. असे ते पुढे म्हणाले.
