दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड – २६ जून २०२५ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त भोकर पोलीस प्रशासना तर्फे जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि समाजात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक अजित कुंभार, स. पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे, संकल्प अकादमीचे प्रा. देशमुख हे प्रमुख उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की – “अंमली पदार्थ जीवनाचा नाश करतात. आपण त्यापासून दूर राहून समाज आणि देशासाठी उपयुक्त नागरिक बनले पाहिजे.”
या कार्यक्रमांतर्गत भोकर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे वाटप करण्यात आली.
समारोप समारंभात, आयोजन समितीने अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
