दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : येथील अडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेश मधील, लहौल जिल्ह्यातील ६१११ मीटर उंच माउंट युनाम हे हिमशिखर यशस्वीरीत्या सर केले. देशभरातून ३० अनुभवी गिर्यारोहक या मोहिमेमध्ये सामील झाले होते, त्यापैकी सात जण शिखर माथ्यावर पोहोचले. हे हिमशिखर सर करणाऱ्या सात गिर्यारोह्कांमध्ये पुण्यातील कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे या तिघांचा सहभाग आहे. या यशामुळे त्यांचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे गिर्यारोहक या मोहिमेची तयारी करत होते.
माऊंट युनम या हिमशिखरावर जवळपास उणे ७ एवढे तापमान असल्याने कडाक्याची थंडी आणि उंचीवर होणाऱ्या सर्व शारिरीक बदलांना सामोरे जावे लागते. मात्र पूर्ण सामर्थ्याने अनेक आव्हानांना तोंड देत हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत मराठमोळ्या गिर्यारोहकांनी हे हिमशिखर सर केले.
शिखरारावर ऑक्सिजनची कमतरता
शिखर माथ्यावर ऑक्सिजन पातळी कमी असल्याने या मोहिमेसाठी इच्छाशक्ती सोबत शारीरिक आणि मानसिक फिटनेस अत्यंत महत्वाचा होता. या उंचीवर 21 टाक्यांऐवजी फक्त 9.5 टक्के एवढाच ऑक्सिजन आहे. त्यामुळे खूप धाप लागते. तेथील वातावरणात मिळते-जुळते होणे खुप गरजेचे आहे त्यासाठी टप्या टप्याने उंची वाढवत जावे लागते. त्यामुळे बएक्लमटाईजेशन फार महत्त्वाचे असते. मनाली, केलॉंग, भरतपूर असा एक-एक मुक्काम करत शिखराचा पायथा गाठला. रात्री 2 वाजता एडव्हान्स बेस कॅम्प वरून मोहीम सूर झाली, बर्फ वितळल्याने थंड पाण्यातून ओढा क्रॉस करून जावं लागलं. सकाळी 10 वाजता शिखर सर करण्यात या गिर्यारोहकांना यश मिळाले.
हिमालयातील नैसर्गिक आव्हाने
अचानक बदलणारे वातावरण, कधी बर्फवृष्टी तर कधी घोंगवणारे वादळ अशा अनेक आव्हानांना तोंड देत पाठीवरील आवश्यक उपकरणं घेऊन ध्येयाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत जावं लागले. हिमस्तरांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पाय खोलवर जात होते. गिर्यारोहकांच्या जिद्दीमुळे यश मिळाले.
मोहिमेसाठी देशभरातून आले होते गिर्यारोहक
हरियाणाहुन दोघे, उडीसा येथील एक, पंजाब येथून दोन, दिल्ली येथील तीन, बिहारचा एक, बेंगलोर-2, केरळ-1, महाराष्ट्र- 4, मनाली येतील 2 तर उत्तराखंड येथील 2 गिर्यारोहक आले होते. एकूण तीस गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला त्यातील सात गिर्यारोहकानी शिखर माथ्यावर पाय ठेवण्यात यश मिळविले.
उंचीवरील होणाऱ्या आजारांचा सामना- बऱ्याच गिर्यारोहकांना उंचीवर होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागले त्यामुळे मोहिमेतून माघार घ्यावी लागली. ऑक्सिजन कमी असल्याने हायपोक्सिया सारख्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे उर्वरित लोकांचे मनोबल चांगले राखणे मोठं आव्हानं असते असे मानसिंह चव्हाण यांनी दैनिक चालु वार्ताशी बोलताना सांगितले.
