दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): नवीन शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची पहिली यादी जाहीर होताच, पैठण तालुक्यासह राज्यातील ग्रामीण भागांत पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गावाजवळील महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना तब्बल 50 ते 60 किलोमीटर दूरच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने पालकांनी शासनाच्या या ऑनलाइन धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गोंधळामुळे ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण थांबण्याची भीती व्यक्त होत आहे.
ऑनलाईन प्रक्रियेचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य
25 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाने राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत झाले असले तरी, आता या प्रणालीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाच्या ‘तारीख पे तारीख’ धोरणाने संताप
अकरावी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 21 मे रोजी सुरू झाली होती. प्रवेशाची पहिली यादी 3 जून रोजी जाहीर होणे अपेक्षित होते, परंतु शिक्षण विभागाने वारंवार तारखा बदलत पालकांना आणि विद्यार्थ्यांना गोंधळात पाडले. 12 जून, 19जून, 26 जून अशा सुधारित तारखा दिल्यानंतर, शेवटी 30 जून रोजी यादी लागणार असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात 28 जून रोजीच यादी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दिशाभूल करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पहिल्या फेरीलाच 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागला असताना, आता दुसऱ्या फेरीसाठी किती वेळ लागेल या चिंतेने पालक ग्रासले आहेत.
ग्रामीण भागातील विज्ञान शाखेची कोंडी
ग्रामीण भागात विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती आहे. 10 ते 15 किलोमीटरच्या परिसरात एकच उच्च माध्यमिक विद्यालय उपलब्ध आहे, तर त्याच अंतरावर 6 ते 8 माध्यमिक शाळा आहेत, ज्यात प्रत्येकी 300 ते 400 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होतात. ऑनलाइन प्रवेशासाठी ग्रामीण भागातून विज्ञान शाखेसाठी जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, या महाविद्यालयांची शासनाने निश्चित केलेली प्रवेश क्षमता केवळ 80 ते 120 आहे. यामुळे उर्वरित शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश कोठे मिळणार, हा गंभीर प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.
पालकांची आर्त विनंती आणि मुलींच्या शिक्षणाची चिंता
काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये अनेक ग्रामीण भागातील मुलामुलींना त्यांच्या गावातील किंवा परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यांना तब्बल 50 ते 60 किलोमीटर दूरच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने पालकांमध्ये शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त होत आहे.
पालकांचे म्हणणे आहे की, “आमच्या मुलामुलींनी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण स्थानिक शाळांमध्ये घेतले. आता अकरावीचे शिक्षण गावाजवळील किंवा परिसरातील महाविद्यालयात घेणे हा त्यांचा हक्क आहे. परंतु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे त्यांना घरापासून लांब जाण्याची वेळ आली आहे.”विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत ग्रामीण भागातील पालकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “जर आमच्या मुलींना जवळच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला नाही, तर आम्ही त्यांना बाहेर शिकायला पाठवणार नाही. त्यांचे शिक्षण पूर्णपणे थांबेल आणि नाईलाजाने आम्हाला मुलींची इच्छा नसताना लवकर लग्न लावून द्यावे लागतील. कारण, जर मुलींना शिकायचेच नाही तर त्यांना रिकामे घरी बसू देणार नाही, आणि या सर्व परिस्थितीस शासन पूर्णपणे जबाबदार असेल,” अशी खंत पालकांनी व्यक्त केली.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
“आमच्या गावामध्ये किंवा परिसरात असणाऱ्या महाविद्यालयात, आमच्या नजरेसमोर मुलामुलींनी शिक्षण घ्यावे असे आम्हाला वाटते. हा आमचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा शासनाला कोणताही हक्क नाही,” असे पालकांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे, ग्रामीण भागातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करावी आणि पारंपरिक पद्धतीने प्रवेश द्यावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून आता जोर धरू लागली आहे. या गंभीर समस्येवर शासनाकडून तातडीने उपाययोजना केल्या जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
