धनंजय मुंडेंच्या आरोपावर संदीप क्षीरसागरांचा पलटवार !
बीड जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवरील छेडछाड आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाने राजकीय वातावरणही तापलं आहे.
या प्रकरणातील आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात थेट आमदार क्षीरसागरांवर आरोप करत खळबळ उडाली असतानाचा संदीप क्षीरसागर यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
माझ्या ओळखीचे असले तरी गुन्हा घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला अटक झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं आहे. मी एसआयटीच्या मागणीला विरोध करत नाही. मी काही 150 दिवस पळून गेलेलो नाही, मस्साजोग प्रकरणात जे झाले त्यात त्यांनीच भूमिका घेतली नाही. आज मंत्रीपद गेलंय म्हणून त्यांना दुःख आहे,” अशा शब्दांत क्षीरसागरांनी पलटवार केला आहे..
धनंजय मुंडेंनी यांनी, पीडितेच्या वडिलांना दोन दिवसांत २० फोन करण्यात आले. तसेच आरोपी विजय पवार गुन्हा दाखल होण्याच्या रात्री क्षीरसागर यांच्यासोबतच होता, असा गंभीर आरोप केला आहे.
क्षीरसागर पुढे म्हणाले की, “मी चहाच्या टपरीवरही लोकांना भेटतो. पीडितेच्या घरी जायचं होतं, पण आत्ताच्या घडीला परिस्थिती पाहता मी तिथे जाणं टाळलं. पोलिसांकडून तत्परतेने कारवाई सुरू आहे. मी प्रशासनासोबत सतत संपर्कात आहे. आरोपी माझ्या ओळखीचा असला तरी कायद्यानं काम व्हावं हीच माझी भूमिका आहे.
बीडचे पालकमंत्री अजित पवार असताना धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असंही क्षीरसागर म्हणाले. त्यांनी गोंधळ घालण्याऐवजी सत्तेत असून कारवाईसाठी दबाव आणावा, अशी सूचनाही दिली. या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
