धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा वापसी…
मुंडेंना कोर्टाचा दिलासा, पण दमानियांचा आक्रमक पवित्रा
मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या कृषी विभागातील घोटाळ्यांवरील याचिका फेटाळल्या, परंतु अंजली दमानियांनी क्लीन चीट नाकारली.
दमानियांचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
सरकारी वकिलांनी चुकीची बाजू मांडल्याने न्यायालयीन निकाल मुंडेंच्या बाजूने गेला, असा आरोप करत दमानियांनी सुप्रीम कोर्टात जायचा निर्णय घेतला.
245 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप कायम
अंजली दमानिया व भाजप आमदार सुरेश धस यांनी मिळून मुंडेंवर सुमारे 245 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यात मोठा दिलासा दिला होता. पण या निकालानंतर 48 तासांच्या आतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा मुंडेंविरोधात तलवार उपसली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं ठणकावलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागातील घोटाळ्याप्रकरणी दिलेल्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपण या प्रकरणी थेट आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की, धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वापसी करू नये. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, पहिले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नंतर माणिकराव कोकाटे यांच्यासारखे कृषिमंत्री झाले. पण मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी, सरकारी वकिलांचा घोळ, यामुळे सगळं मुंडेंच्या पथ्यावर पडलं असल्याची संतप्त प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंविरोधात कृषी विभागातील झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन्हीही याचिका फेटाळल्यानंतर अंजली दमानिया आता आणखी आक्रमक झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, परवा संध्याकाळी हायकोर्टाने ऑर्डर पास केली आहे. मला यामध्ये काय त्रुटी वाटत आहेत त्या मी मांडणार आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत,असंही त्यांनी सांगितलं.
तसेच शासनाकडचे जे वकील होते, त्यांनी अतिशय शातीरपणे सगळं मांडलं. जे दोन जीआर होते, वेगवेगळ्या विभागाचे आहेत, असंही दमानिया यांनी म्हटलं. वकिलांनी न्यायालयात जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चारही केला नाही. या वकिलांकडून भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेलेला नाही. यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळालेली नसल्याचंही त्यांनी ठणकावलं आहे.
दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना या संपूर्ण प्रकरणी चॅलेंज करायची गरज असल्याची भूमिकाही मांडली. त्या म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे. सत्यमेव जयते हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही. वी राधा ज्या सचिव होत्या, त्यांचा अहवाल कधीही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आठवेळा सचिवाने हे सर्व चुकीचं होतं असल्याचं सांगितल्याचंही दमानिया यावेळी म्हणाल्या. .
भाजप आमदार सुरेश धस यांनी तब्बल 200 कोटींचा तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र,मुंबई उच्च न्यायालयानं मुंडेंना दिलासा देताना त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारच्या कृषी विभागानं केलेल्या कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णय हा नियमानुसार झाल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
