माझा जरांगेंना मनापासून पाठिंबा; खासदार भगरे थेट आझाद मैदानात !
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आज मुंबईत आझाद मैदानावर सुरू झाले. या आंदोलनात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी झाले आहे. आज सकाळी नाशिकहून शेकडो कार्यकर्ते वाहनांसह आज सकाळी रवाना झाले.
आज सकाळी नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात दर्शन केल्यानंतर कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला रवाना झाले. यावेळी कालिकादेवी संस्थानचे प्रमुख अण्णा पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी, महाराष्ट्र माझा परिवाराचे संयोजक बंटी भागवत, छावा संघटनेचे करण गायकर यांचं विविध पदाधिकारी उपस्थित होते.
विविध लोकप्रतिनिधींनी येथे उपस्थित राहून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार अहिरे स्वतः उपस्थित राहिल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
यावेळी आमदार अहिरे म्हणाल्या, माझ्या मतदारसंघातील लोक भावनेचा आदर म्हणून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मागण्यांबाबत काय करावे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या कार्य कक्षेतील विषय आहे. याबाबत समिती नेमावी अथवा काय करावे हा सरकारचा तांत्रिक विषय आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रदीर्घ काळापासून आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील आज मुंबईत आंदोलन करीत आहेत. त्यांना राज्यभरातील मराठा समाजातील युवकांनी गोरगरीब जनतेने पाठिंबा जाहीर केलेला आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने आणि सहानुभूतीने पहावे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या संदर्भात योग्य ती भूमिका घेतील. मी मात्र माझे समर्थक आणि मतदारसंघातील नागरिकांच्या भावनांचा विचार करून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आज मुंबईला दौरा करीत आहे. महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी मुंबईत आहेत. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणाच्या मागणीला आपले समर्थन असल्याचे सांगितले.
