
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाने ते चांगलेच अडचणीत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या विषयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या विषयावर आता थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न करण्यात आला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते स्वतःच्याच जाळ्यात अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदार पडळकर यांच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिकचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी पडळकर यांचा निषेध केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत नेते आहेत. भारतीय जनता पक्ष हा पार्टी वीथ डिफरन्स आहेत. त्यामुळे त्यांना आमदार पडळकर यांची विधाने मान्य होण्यासारखी नसतील, असा विश्वास राज्यातील सुसंस्कृत नागरिकांना वाटतो आहे.
या संदर्भात श्री शेलार यांनी आमदार पडळकर यांचा निषेध केला. आमदार पडळकर हा भाजपने माजवलेला मोकाट नेता आहे. त्याची सध्याची विधाने कदाचीत त्याच्या काही समर्थकांना मनातून गुदगुल्या करीत असतील. मात्र हाच नेता त्याचा पक्ष आणि नेता दोघांनाही संकटात नेल्याशिवाय राहणार नाही.
माजी मंत्री जयंत पाटील हे गेली वीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व केलेले आणि सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आरोप आणि टीका करण्यासाठी विरोधकांकडेही मुद्दे नसतात. अशा नेत्या विषयी आमदार पडळकर यांनी केलेले वक्तव्य धक्कादायक आहे.
श्री पडळकर यांच्या वक्तव्याने सुसंस्कृत नागरिकांना नक्कीच संताप वाटतो. सहकार क्षेत्रात उत्तुंग काम केलेल्या (कै.) राजाराम बापू पाटील यांच्या विषयी देखील पडळकर यांनी गरळ ओखली. उद्या अशी भरकटलेली व्यक्ती मुख्यमंत्री, पंतप्रधान अथवा अन्य महनीय व्यक्तीविषयी देखील अपशब्द उच्चारू शकते.
अवमानकारक आणि हिन वक्तव्य हा पडळकर यांच्या संस्काराचा भाग वाटतो. अशा व्यक्तीला भाजपने डोक्यावर घेतले आहे. भाजपला संकटात नेण्यासाठी पडळकर नक्कीच कारणीभूत ठरतील, असा दावा शेलार यांनी केला.