
एका खेळीने धोनीला टाकलं मागे; केला मोठा विक्रम…
आशिया चषक स्पर्धेतील शेवटचा गट सामना भारतीय संघाने जिंकला. भारताने ओमान विरूद्ध २१ धावांनी शानदार विजय मिळवत विजयी घोडदौड सुरूच ठेवली.
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ओमानला फक्त १६७ धावाच करता आल्या. भारतीय संघाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब मिळाला. तसेच, त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रमही मोडला.
संजूने धोनीला मागे टाकले
ओमानविरुद्धच्या सामन्यादरम्यान, भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने एक मोठा विक्रम रचला. त्याने षटकार मारण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकले. त्याच्या ५६ धावांच्या खेळीदरम्यान, संजूने तीन षटकार मारले. त्यामुळे टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण ३५३ षटकार झाले. या सामन्यापूर्वी सॅमसन आणि धोनीच्या नावावर ३५० षटकार होते. टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसन आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू
रोहित शर्मा: ५४७ षटकार
विराट कोहली: ४३५ षटकार
सूर्यकुमार यादव: ३८२ षटकार
संजू सॅमसन: ३५३ षटकार
महेंद्रसिंग धोनी: ३५० षटकार
दरम्यान, आता भारताचे सुपर ४चे सामने उद्यापासून सुरू होणार आहे. आधी पाकिस्तान, मग बांगलादेश आणि शेवटी श्रीलंका असे तीन सामने भारत खेळणार आहे.