
महायुतीतील मतभेदामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्व सूत्रे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आली आहेत.
दरम्यान, मंत्री महाजन यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील एका भाजप आमदारानेही आता कुंभमेळा नियोजनात एंट्री घेतली आहे.
आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मियांचा हा सर्वात मोठा धार्मिक सोहळा असल्याने महायुतीच्या सत्ताधारी पक्षांसाठी आपला प्रभाव टिकवून ठेवणे प्रतिष्ठेची बाब झाली आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये या पदासाठी जोरदार रस्सीखेच देखील सुरू आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ आणि ॲड. माणिक कोकाटे तसेच शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते दादा भुसे हे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्याबाबतीत इतक्या दिवसात कोणताच अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कोटींची विकास कामे आगामी काळात होणार आहेत. कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती स्थापन करण्यात आली आहे. आणि पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या चार मंत्र्यांना त्या समितीत स्थान देण्यात आले आहे. अर्थात, या समितीचे प्रमुख म्हणून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच सर्व सूत्रे आहेत.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून बराच संघर्ष झाला. गिरीश महाजन यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) तीव्र विरोधामुळे त्यास लागलीच स्थगिती देण्यात आली. या सर्व गोंधळामुळे पालकमंत्रीपद नसल्याने काय फरक पडतो. कुंभमेळा म्हणून सर्व अधिकार आपल्याकडे असल्याने आता नाशिकचा पालकमंत्री करा अथवा करू नका, असे बोलून मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना आणखी जास्त डिवचले आहे. दुसरीकेड, मंत्री महाजन यांचा उजवा हात मानल्या जाणारे चाळीसगावमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची कुंभमेळा नियोजन बैठकांमधील उपस्थिती विरोधकांना आणखी अस्वस्थ करणारी ठरली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कुंभ मंथन बैठक पार पडली. त्या बैठकीत आमदार राहुल ढिकले यांच्याशिवाय एकही स्थानिक आमदार उपस्थित नसताना आमदार चव्हाण यांनी तिथे आवर्जून हजेरी लावली. ज्यामुळे शिंदे गटासह अजित पवार गटाच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे.
नागपूर बैठकीतही चव्हाण उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये जून महिन्यात त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली होती. कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून नाशिकला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांच्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच विविध उपाययोजनांवर सविस्तर त्यावेळी चर्चा झाली होती. त्या बैठकीतही चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण मंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर उपस्थित होते.