
लातूर येथे झालेल्या द्वैवार्षिक विद्यार्थी परिचर्या परिषदेत करण्यात आला गौरव…
ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
ठाणे (१३) : ठाणे महानगरपालिकेच्या सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी वैभवी फर्डे हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लातूर येथे झालेल्या स्टुडंट नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसएनएआय) ३१व्या द्वैवार्षिक राज्य परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
लातुर येथे नुकत्याच (शुक्रवार, १० ऑक्टोबर) झालेल्या द्वैवार्षिक परिषदेत ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (TNAI) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या सचिव रत्ना देवरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे उपाध्यक्ष अरुण कदम, टीएनआयएचे उपाध्यक्ष दीपकमल, महाराष्ट्र राज्य शाखेचे राजाभाऊ राठोड, एसएनएआयच्या सल्लागार शिल्पा शेट्टीगार आदी उपस्थित होते.
सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या शिक्षण संस्थेत जीएनएमचे शिक्षण घेत असलेली वैभवी फर्डे हिला उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती, क्लिनिकल कौशल्य, नेतृत्वगुण तसेच, नर्सिंग व्यवसायातील निष्ठा आणि समर्पण यांचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण काळात तिने सातत्याने करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णसेवा व सुरक्षेप्रती असलेली सखोल बांधिलकी कर्तव्यातून दाखवली.
या पुरस्कारात माझी संस्था, सर्व शिक्षक, प्राचार्य, पालक यांचा मोलाचा वाटा आहे. मी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्याबद्दल मनापासून आनंद झाल्याची प्रतिक्रिया वैभवी फर्डे हिने व्यक्त केली. तर, संस्था परिवाराकडून वैभवी फर्डे हिचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. तिचे हे यश सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या शिक्षण संस्थेने दिलेल्या उत्कृष्ट शिक्षण आणि प्रशिक्षणाचे प्रतीक आहे. तिच्यासारखी विद्यार्थिनी आमच्या संस्थेची प्रतिनिधी असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप यांनी व्यक्त केली आहे.
एस.एन.ए.आय.च्या ३१व्या द्वैवार्षिक राज्य परिषदेत संस्थेतर्फे नर्सिंग ट्यूटर चित्रा पोळेकर, रेखा कुंभार आणि संस्थेतील २१ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या परिषदेच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात, पल्लवी पवार हिला पेन्सिल स्केचिंगमध्ये दुसरे, तर, प्रणाली पाटील आणि गौरी जाधव यांना पोस्टर पेण्टींगमध्ये तिसरे बक्षीस मिळाले. त्याचबरोबर, संस्थेला महाराष्ट्रातून उत्कृष्ट एसएसएआय युनिटचे दुसरे पारितोषिक मिळाले.