दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी -राजेंद्र पिसे
गोरडवाडी : शिवप्रसाद फाउंडेशन आणि सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिराचा ५१७ नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. शरद (बापू) मोरे व मा. जि.प. सदस्या सौ. ऋतुजाताई शरद मोरे यांच्या हस्ते महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या शिबिरात हृदयरोग, डोळे, कॅन्सर, मनका, मूत्रविकार, रक्त तपासणी यांसह विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. हृदयरोग तपासणी (ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी), युरोलॉजी तपासणी (किडनी, लघवीचे आजार, मूत्राशय, प्रोस्टेट), कॅन्सर तपासणी, मेंदू व मज्जातंतू तपासणी तसेच डोळ्यांच्या तपासणीसह मोठ्या प्रमाणावर मोफत चष्मे वाटप करण्यात आले. याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराचे नियोजन व वैद्यकीय कामकाज डॉ. लताताई मोरे यांनी पाहिले.
या प्रसंगी मा. श्री. शरद (बापू) मोरे, सौ. ऋतुजाताई मोरे, डॉ. लताताई मोरे, श्री. पांडुरंग पिसे (सरपंच), श्री. नवनाथ केंगार (उपसरपंच), श्री. मच्छिंद्र गोरड (सदस्य), श्री. रामचंद्र गोरड (माजी सरपंच), श्री. दीपक (आबा) गोरड (माजी उपसरपंच) यांच्यासह मान्यवर, सेवासदन हॉस्पिटलचे डॉक्टर, शिवप्रसाद फाउंडेशनचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.


