पालघर (प्रतिनिधी) : मिलिंद चुरी
परतीच्या पावसाने शेतकरी राजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अनियमित आणि जोरदार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दिनांक २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अचानक झालेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कापणी करून ठेवलेले पीक नुकसानग्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश शेंडगे यांनी संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
तहसीलदार कार्यालय, पालघर येथून जारी केलेल्या पत्रानुसार गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी तात्काळ कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.
अचानक झालेल्या पावसामुळे विशेषतः कापणी करून ठेवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालांवरून स्पष्ट झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे दि. २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांची यादी विहित नमुन्यात सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
तसेच, खरिप हंगाम २०२५ अखेरपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी आधीच नुकसानभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करू नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. दुबार नुकसानभरपाई टाळण्यासाठी सर्व स्तरांवर काळजी घेण्याचे आदेशही तहसीलदार शेंडगे यांनी दिले आहेत.
परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण केले असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया गतीमान करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


