सुषमा अंधारेंच्या गंभीर आरोपांनी महाराष्ट्रात खळबळ…
फलटणमधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात माढ्याचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना क्लिनचिट देण्याची घाई करू नये, निंबाळकरांनी पोलिसांना हाताशी धरून हे सर्व घडवून आणले आहे.
त्याबाबतचे अनेक दाखले माझ्याकडे आहेत. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या (इन्सिटट्यूशनल मर्डर) आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा)च्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना दिलेले क्लिनचिट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवावा हा अलिखित संकेत असल्याचेही त्या म्हणाल्या.मुंडे यांच्या हातावरील सुसाइड नोटनुसार गोपाळ बदने, प्रशांत बनकर यांना आत्महत्येस जबाबदार धरले. तसेच त्यांच्यावर खोटे फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी निंबाळकर दबाव टाकत होते. त्यामुळे संशयाची सुई निंबाळकर यांच्याकडे जाते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोणत्या आधारावर क्लिन चिट दिली, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.
प्रमाणपत्र नक्की कशाचे?
प्रमाणपत्र आणि निंबाळकरांबाबत त्या म्हणाल्या, निंबाळकर कारखान्याकडील ऊसतोड कामगार उचल घेतात. त्यानंतर काहीजण गायब होतात. अशा कामगारांना पैसे वसुलीसाठी निबाळकरांनी छळलं आहे. अशा कामगारांना अटक करण्यासाठी त्याचे फिटनेस प्रमाणपत्र तयार केले जाते. त्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला. त्यास मुंडे यांनी अनेकदा नकार दिल्याने त्यांचा छळ होत होता. निंबाळकर भाजपात गेले तेव्हापासून त्यांनी ऊसतोड कामगारांविरोधात २७७ तक्रारी केल्या आहेत.
डॉ. संपदाच्या आत्महत्येबाबत त्या म्हणाल्या, संपदा हॉटेलमध्ये गेली कशी काय? तिला रात्री १ वाजता प्रवेश दिला कसा? गावात घर असताना हॉटेलला का गेली? हॉटेल भोसले नामक माणसाचे असून तो भाजपचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. त्यामुळे ही आत्महत्या नाही असा संशय आहे.निंबाळकरांमुळे यापूर्वीही अनेकांनी आत्महत्या केली आहे. दोन वर्षांपूर्वी नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वीच्या व्हिडीओत निंबाळकरांचे नाव घेतले होते. अंधारे यांच्यासोबतच्या जयश्री व वर्षा आगवणे यांच्याबाबत त्या म्हणाल्या, दोन्ही मुलींचे वडील दिगंबर आगवणे निंबाळकरांसोबत भागीदारीमध्ये होते. निंबाळकरांनी त्यांची संपत्ती बँकेकडे तारण ठेवली. पुढे दिगंबर यांच्या अटकेनंतर दबाव टाकल्याने या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी निंबाळकरांचे पीए रोहित नागटिळक, राजेश शिंदे, डॉ अशंमन धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, एपीआय जायपात्रे, पीएसआय पाटील यांच्या चौकशीची अंधारे यांनी मागणी केली. निंबाळकरांच्या कारखान्याच्या बॉयलरमध्ये नक्की किती जणांचा मृत्यू झाला, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.


