ठाणे : ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला.
त्यावेळी केळकर यांचे अभिनंदन करत ‘ मी कट्टर भाजप समर्थक ‘ असल्याने बिहार मधील भाजपाच्या विजयचा आनंद झाल्याचे अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या.
गंधार बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा गंधार गौरव पुरस्काराचे दहावे वर्षे होते. हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पतकी, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांची उपस्थिती होती.
निवेदिता सराफ म्हणाल्या, आज जी मी काही आहे ते माझे गुरु ,पती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला. याचा विशेष आनंद होत आहे. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली. बालनाट्य करण हे खूप कठीण आहे आणि काळाची ती खुप मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बालनाट्य केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून उद्याचे प्रेक्षक घडतात असे त्या म्हणाल्या. नाटक कसे बघितले पाहिजे याचेही शिक्षण बालनाट्याच्या माध्यमातून दिले जाते. बालनाट्य शिकून चांगले श्रोते बनतात त्यामुळे अशी शिबिरे घेतली पाहिजेत. बालनाट्यासाठी माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करेल. बालनाट्य ही सातत्याने केली पाहिजेत असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना उजाळा दिला. आज मला माहेरचा पुरस्कार मिळाला असे वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
सर्व देश भाजपमय झाले पाहिजे
या सोहळ्यात मंचावर भाषण करताना आमदार संजय केळकर म्हणाले, बिहारमध्ये डबल सेंच्युरी मारली ती तुमच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगले असते हे जनतेने दाखवून दिलेले आहे. आता फक्त बिहारच नव्हे तर सर्व देश भाजपमय झाले पाहिजे असे त्यांनी वक्तव्य केले.


