नगरपालिका निवडणुकीतून दिला महापालिकेसाठी शिंदे सेनेला मेसेज !
नाशिक महापालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे पक्षासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने महायुतीतच स्वबळाचा संदेश दिला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्ष सावध झाला आहे.
नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी चाचपडत आहे. महायुती मात्र स्वबळावर मैदानात उतरली आहे. यातून भाजप नेते गिरीश महाजन यांनी महायुतीच्या सहकाऱ्यांनाच स्पष्ट संदेश दिला आहे.
जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात बहुतांशी ठिकाणी भाजपने स्वबळाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्याची सर्व सूत्रे मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती.
या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुतीचे पक्ष स्वतःची ताकद अजमावत आहेत. आमदार आणि स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात वर्चस्व टिकविण्यासाठी युतीची भाषा करणारेच परस्परांच्या विरोधात ठाकले आहेत.
ओझर, पिंपळगाव बसवंत, त्र्यंबकेश्वर आणि काही अपवाद वगळता भाजपला स्वबळावर निवडणुकीत उतरता आलेले नाही. त्यामुळे एकाच वेळी शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला त्यांनी चर्चेत गुंतवून ठेवले. लाभदायक वाटाघाटी पदरात पाडून घेतल्या. त्यामुळे त्याचे पडसाद महापालिका निवडणुकीवर उमटणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात तर माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर, ओझर, पिंपळगाव बसवंत येथे सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत. यामध्ये महाविकास आघाडी चाचपडताना दिसली. व वगळता महाविकास आघाडी कुठेही निवडणुकीवर प्रभाव निर्माण करू शकली नाही.
नगरपालिकेच्या निवडणुकीतील राजकारणाचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणे अपरिहार्य आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेत हंड्रेड प्लस हा नारा दिला आहे. १२२ पैकी १०० जागांवर भाजपचा दावा यातून दिसतो. त्यामुळे २२ जागांवर शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे समाधान अशक्य झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेचाच कित्ता महापालिकेत गिरवला जाणार. याची जाणीव झाल्याने शिवसेना शिंदे पक्ष स्वबळाची तयारी करीत आहे.


