आरक्षणावर IAS अधिकाऱ्याच्या विधानानं मोठा वाद !
मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यानं आरक्षणाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. एखादा ब्राह्मण जोपर्यंत त्याची मुलगी दान देत नाही, तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवं, असं विधान आयएएस अधिकाऱ्यानं केलं आहे.
त्यांच्या विधानानं वादंग माजला आहे. ब्राह्मण समाजाशी संबंधित संघटनांनी विधानाचा तीव्र निषेध केला असून आयएएस अधिकाऱ्याच्या माफीची मागणी केली आहे.
वरिष्ठ आयएएस अधिकारी संतोष वर्मा यांची नुकतीच मध्य प्रदेश अनुसूचित जाती-जनजाती अधिकारी आणि कर्मचारी संघाच्या (अजाक्स) प्रांताध्यक्ष पदी नियुक्ती झाली. या निमित्तानं राजधानी भोपाळमध्ये एका अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना संतोष वर्मा यांनी वादग्रस्त विधान केलं. ‘एका कुटुंबात एका व्यक्तीला आरक्षण मिळायला हवं. आरक्षण तोपर्यंत मिळायला हवं, जोपर्यंत माझ्या मुलाला कोणी ब्राह्मण त्याची लेक दान म्हणून देत नाही किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवत नाही,’ असं वक्तव्य वर्मा यांनी केलं.
संतोष वर्मा यांनी २३ नोव्हेंबर रोजी वादग्रस्त विधान केलं. सोमवारी त्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी आयएएस अधिकारी संतोष वर्मा यांचा निषेध सुरु केला. या मुलींचा अपमान असल्याचं ब्राह्मण समाजाच्या लोकांनी म्हटलं. संतोष वर्मा यांचं विधान अतिशय दुर्दैवी आणि संतापनजक असल्याचं अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे प्रदेशाध्यक्ष पुष्पेंद्र मिश्र यांनी म्हटलं. ‘मध्य प्रदेशात लाडली लक्ष्मी-लाडली बहना यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान मोदी ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ अभियान राबवत आहेत. पण एक आयएएस अधिकारी मुलींवर अशी विधानं करत आहेत,’ असं मिश्र म्हणाले.
आयएएस अधिकारी संतोष वर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर मंत्रालयात आंदोलन केलं जाणार आहे. मंत्रालयातील सवर्ण कर्मचारी मंत्रालयात आंदोलन करणार आहेत. आंदोलकांकडून उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांची भेट घेऊन आयएएस अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात येईल. ब्राह्मण समाजाशी संबंधित अन्य संघटना भोपाळमध्ये अधिकाऱ्याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अधिकाऱ्यानं माफी न मागितल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.


