सटाणा (नाशिक) : अमोल बच्छाव
: सटाणा तालुकातील भाक्षी येथे एका दिवट्या-बुधल्यांच्या बोडकाच्या जेवणावळीत दि. ८ फेब्रूवारी रोजी काही लोकांनी कुरापत काढत वाढपी काम करणाऱ्या दलित-आदिवासी युवकांना जातीवाचक अर्वाच्च उल्लेख करत अमानवी मारझोड केल्याची गंभीर घटना घडली होती.
या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी पीडितांना कायदेशीर दिलासा देण्याच्या हेतून पोलीस ठाणे गाठले होते, त्यानंतर या प्रकरणी ह्रषीकेष विजय सावळा (रा. आसखेडा, बागलाण) याच्यासह नवरदेव, नवरदेवाचा भाऊ आणि इतर गुन्ह्यातील सहभागी असणाऱ्यांवर अनु. जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांतर्गत सटाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याची नोंद होताच आरोपी फरार होते; मात्र रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता प्रा. अमोल बच्छाव यांनी हे प्रकरण थेट नाशिक ग्रामिणचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील (भा.पो.से) यांच्या निदर्शनास आणून दिल्याने पोलीस अधिक्षकांनी घटनेची तीव्रता लक्षात घेऊन तात्काळ मालेगाव ग्रामिणचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले.
त्यानंतर तपासाची चक्र जलद फिरताच अखेर दि. ११ फेब्रूवारी रोजी रात्री उशीरा ह्रषीकेश विजय सावळा (वय २९ रा. आसखेडा), स्वप्निल शरद सावळा (वय ३४ रा. आसखेडा), महेश पुरुषोत्तम भामरे (वय २८ रा. तांदूळवाडी) यांना सटाणा पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात दहशतीसाठी वापरण्यात आलेली काळ्यालरंगाची महिंद्रा कंपनीची थार गाडी (MH ४१ BN ०६२९) मुद्देमाल म्हणून जमा करण्यात आली, गुन्ह्यातील आरोपी जयेश संदीप सोनवणे (नवरदेव रा. सटाणा, बागलाण), कुणाल संदीप सोनवणे (रा. सटाणा, बागलाण) यांचे नाव निष्पन्न करत इतर तपासाच्या बाबी पूर्ण करण्यात आल्यानंतर या सर्व आरोपींना पोलीसांनी दि. १२ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मालेगाव यांच्यासमोर हजर केले.
दरम्यान न्यायालयाने ह्रषिकेश विजय सावळा, स्वप्निल शरद सावळा, महेश पुरुषोत्तम भामरे यांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले असता, त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड येथे करण्यात आली. पोलीसांनी आता या प्रकरणातील इतर आरोपी नवरदेव जयेश संदीप सोनवणे (सटाणा), कुणाल संदीप सोनवणे (सटाणा) व अन्य आरोपींवर लक्ष केंद्रीत केल्याने आता नवरदेव आणि नवरदेवाचा भाऊ पोलीसांच्या रडारवर आले आहेत. पुढील कार्यवाही काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
