इस्रायलमुळं काही तासांत होर्मुझ बंद, इराणनं का घेतला निर्णय…
अमेरिका आणि इराणने शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात होईल अशी चिन्हे दिसत होती.मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या मित्र देशानं अडचणीत आणल्याचं चित्र आहे.
शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इस्रायलने हल्ले केल्यानं शस्त्रसंधी ही अल्पजीवी ठरली. अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागला होता. शस्त्रसंधीमध्ये हा मार्ग खुला करण्यात आला होता. मात्र, इस्रायलमुळे काही तासामध्येच होर्मुझमधील जलवाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.
मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच आता परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे. इराण आणि इस्रायलमधील शस्त्रसंधीच्या आशा धूसर झाल्या असून इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग,’होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली असून कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल 97 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.
होर्मुझ का बंद झाले?
इस्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेल्या सततच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ इराणने हे पाऊल उचलले आहे. इराणच्या अधिकृत माध्यमांनुसार, जोपर्यंत इस्रायल लेबनॉनमधील लष्करी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत या मार्गावरून तेल टँकरची वाहतूक होऊ दिली जाणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर काही टँकर्स सुरक्षितपणे बाहेर पडले होते, मात्र लेबनॉनमधील हल्ले तीव्र होताच इराणने पुन्हा नाकेबंदी केली आहे.
शस्त्रसंधीला ग्रहण आणि इराणचा अल्टीमेटम
इराणने स्पष्ट इशारा दिला आहे की, इस्रायलने लेबनॉनमधील अत्याचार न थांबवल्यास ते अधिकृतपणे शस्त्रसंधी करारातून बाहेर पडतील. “इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू ठेवल्यास आम्ही करार मानणार नाही,” असे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलचा दावा आहे की लेबनॉन हा या कराराचा भाग नाही, ज्यामुळे हा वाद अधिक चिघळला आहे.
इस्रायलनं वाढवलं जगाचं टेन्शन…
या घडामोडींमुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेने इराणचा हा निर्णय ‘पूर्णपणे अस्वीकार्य’ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शस्त्रसंधी सर्वत्र लागू व्हावी अशी मागणी केली आहे.या आठवड्यात इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, जमिनीवर युद्धसदृश परिस्थिती कायम असल्याने जगाचे लक्ष आता कच्च्या तेलाच्या पुरवठ्याकडे लागले आहे.
