ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मोहिनी भट्टाचार्य मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांच्या बहुआयामी कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. “बाबासाहेब म्हणजे नेमके कोण?” या प्रश्नाचे प्रभावी उत्तर देत त्यांनी त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी विधी विभागाचे प्रा. ॲड. विशाल धनवटे यांनी बाबासाहेबांचा खडतर आणि संघर्षमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रा. अमित गडकरी यांनी “बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त करत त्यांच्या योगदानाचे स्मरण करून दिले. तसेच ॲड. सुजाता मॅडम यांनी बाबासाहेबांची जयंती केवळ एका दिवसापुरती न ठेवता त्यांच्या विचारांचे दैनंदिन आचरण करण्याचे आवाहन केले. प्रा. अफरोज मॅडम यांनीही संविधान निर्मितीतील बाबासाहेबांच्या योगदानावर भाष्य केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बाबासाहेबांच्या जीवनावर भाषणे सादर केली. ऋग्वेद गायकवाड, अमित गायकवाड, महेश भोईर, प्रफुल ढवाळकर, सुरेश बनसोडे, संतोष कुलकर्णी, मंजिरी निमणे, रजनी वाघुळे, रिंकू खोळंबे, दर्शना म्हसे आदी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विधी शाखेतील विद्यार्थिनी दर्शना म्हसे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर संतोष कुलकर्णी याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच प्रथम वर्ष विधी विभागातील विद्यार्थिनी आयशा मुलाणी हिने अलीकडील परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता कदम व सुजल गायकवाड यांनी केले. तसेच सागर सपकाळे, ऋग्वेद गायकवाड, उन्मेष कदम आणि इतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता आणि संविधानिक मूल्यांविषयी आदर निर्माण करणारा ठरला.

