
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
“तामिळनाडूमध्ये येण्याचा अनुभव कायमच आनंददायी. ही भूमी विशेष आहे. इथले लोक, संस्कृती आणि भाषा अद्वितीय आहे ”
“तामिळ भाषा शाश्वत आहे आणि तामिळ संस्कृती वैश्विक आहे”
“भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आधुनिकीकरण आणि विकास केला जात आहे. त्याच वेळी, या आधुनिकीकरणाचा स्थानिक कला आणि संस्कृतीशी संगम घडवला जात आहे”
“भारत सरकारचा पूर्ण भर देशात, सर्वोत्तम दर्जाच्या आणि शाश्वत पायाभूत सुविधा बांधण्यावर आहे”
“महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण निर्दोष आणि समग्र होईल, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु”
“गरीब कल्याण करण्याचे आमचे उद्दिष्ट”
“एक जवळचा मित्र आणि शेजारी या नात्याने, भारत श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करत आहे”
“तामिळ भाषा आणि संस्कृती जगभर आणखी लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे कटिबद्ध”
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज तामिळनाडूची राजधानी चेन्नई इथे, 31,500 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधा विकास होईल, दळणवळणाच्या सुविधा वाढतील आणि या प्रदेशातील लोकांचे जीवनमान अधिक सुखकर होण्यास मदत होईल.
तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, केंद्रीय मंत्री एल मुरूगन यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना, पंतप्रधानांनी तामिळनाडू इथे पुन्हा येण्याचा योग आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “तामिळनाडू इथे येणे हा माझ्यासाठी नेहमीच सुखद अनुभव असतो. ही भूमी विशेष आहे. इथले लोक, इथली संस्कृती आणि भाषा अद्वितीय आहे.” असे उद्गार त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काढले. तामिळनाडूमधली कोणती ना कोणती व्यक्ती कायम आपल्या क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करत असते. दोनच दिवसांपूर्वी डेफीलिंपिक स्पर्धेतल्या खेळाडूंशी संवाद साधतांनाची आठवण सांगत ते म्हणाले, “यावेळी, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. आपण एकूण 16 पदके जिंकलीत, त्यात, सहा पदके तामिळनाडूच्या युवा खेळाडूंनी मिळवलेली आहेत”.
समृद्ध तामिळ संस्कृतीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “तामिळ भाषा शाश्वत आहे आणि तामिळ संस्कृती वैश्विक आहे. चेन्नई पासून कॅनडापर्यंत, मदुराईपासून मलेशियापर्यंत, नमक्कलपासून न्यू यॉर्कपर्यंत, सालेमपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोंगल आणि पुथांडू मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.” तामिळनाडूचे महान सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री थिरू एल. मुरुगन यांनी पारंपारिक तामिळ पोशाखात कान चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवरून प्रवेश केला, यामुळे जगभरातील तामिळ लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला, असे पंतप्रधान म्हणाले.
आज उद्घाटन झालेल्या आणि कोनशीला ठेवल्या गेलेल्या प्रकल्पांत रस्ते जोडणीवर दिलेला भर दिसून येत आहे. याचा आर्थिक भरभराटीशी थेट संबंध आहे. बंगळूरू – चेन्नई द्रुतगती महामार्ग दोन मोठ्या शहरांना जोडेल तसेच चेन्नई बंदर ते मदुरवॉयल हा दुमजली उन्नत मार्ग चेन्नई बंदराची कार्यक्षमता तर वाढवेलच, त्याच बरोबर शहरातील वाहतूक कोंडी देखील संपेल, पंतप्रधान म्हणाले. पाच रेल्वे स्थानकांचा पुनार्विकास होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हे आधुनिकीकरण आणि विकास भविष्यातील गरजा लक्षात घेऊन केले जात आहे. त्याच वेळी, यात स्थानिक कला आणि संस्कृतीचा संगम असेल. मदुराई – तेनी रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेतकरी आपली उत्पादने नवनवीन बाजारपेठांत पाठवू शकतील, असे पंतप्रधान म्हणले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ऐतिहासिक चेन्नई लाइट हाऊस प्रकल्पाचा भाग म्हणून घरे मिळवणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. “आम्ही जागतिक बदल सुरू केल्यामुळे हा एक अतिशय समाधानकारक प्रकल्प आहे .. आणि विक्रमी वेळेत पहिला प्रकल्प साकारला गेला आहे आणि मला आनंद आहे की तो चेन्नईमध्ये आहे”, ते म्हणाले.
पंतप्रधानांनी नमूद केले की मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्क आपल्या देशाच्या मालवाहतूक परिसंस्थेमध्ये एक आदर्श बदल ठरतील. विविध क्षेत्रांतील यापैकी प्रत्येक प्रकल्प रोजगार निर्मितीला आणि आत्मनिर्भर होण्याच्या आमच्या संकल्पाला चालना देईल, असे ते म्हणाले.
इतिहासाने आपल्याला शिकवले आहे की ज्या राष्ट्रांनी पायाभूत सुविधांना सर्वाधिक महत्त्व दिले, त्या राष्ट्रांनी विकसनशील देशांकडून विकसित देशांमध्ये संक्रमण केले,असे पंतप्रधानांनी सांगितले. भौतिक आणि तटीय पायाभूत सुविधांचा संदर्भ देत ते म्हणाले की केंद्र सरकार उच्च दर्जाच्या आणि शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. गरीब कल्याण साध्य करण्याचे आमचे ध्येय आहे. सामाजिक पायाभूत सुविधांवरचा आमचा भर हा ‘सर्व जन हिताय आणि सर्व जन सुखाय’ या तत्त्वावर असल्याचे सूचित करतो, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार महत्त्वाच्या योजनांसाठी परिपूर्णता पातळी गाठण्यावर काम करत आहे. कोणतेही क्षेत्र घ्या – शौचालये, गृहनिर्माण, आर्थिक समावेश… आम्ही संपूर्ण समावेशासाठी काम करत आहोत. हे पूर्ण झाल्यावर वगळणुकीला वाव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पारंपरिकपणे ज्याला पायाभूत सुविधा म्हणून संबोधले जाते त्यापलीकडे सरकार गेले आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी पायाभूत सुविधाचा अर्थ रस्ते, वीज आणि पाणी असा होता. आज आम्ही भारतातील गॅस पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत आहोत. ‘आय- वे’ वर काम सुरू आहे. प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
तमिळ भाषा आणि संस्कृती अधिक लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. या वर्षी जानेवारीत चेन्नईमध्ये केंद्रीय प्राचीन तमिळ संस्थेच्या नवीन संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन संकुल पूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून आहे. ते पुढे म्हणाले की, बनारस हिंदू विद्यापीठात तमिळ अभ्यासावरील ‘सुब्रमणिया भारती अध्यासनाची ‘ची घोषणा नुकतीच करण्यात आली. ते म्हणाले की बनारस हिंदू विद्यापीठ त्यांच्या मतदारसंघात असल्याने हा आनंद विशेष होता.
पंतप्रधान म्हणाले की, श्रीलंका सध्या कठीण काळातून जात आहे. मला खात्री आहे की तुम्हाला तेथील घडामोडींची काळजी आहे. एक जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. जाफनाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. भारत सरकार श्रीलंकेतील तमिळ लोकांना मदत करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेत आहे. या प्रकल्पांमध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, गृहनिर्माण आणि संस्कृतीचा समावेश होतो.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या देशाच्या सामूहिक संकल्पाचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी समारोप केला.
पंतप्रधानांनी 2960 कोटी रुपयांहून जास्त किमतीचे पाच प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा 75 किलोमीटर लांबीच्या मदुराई-तेनी (रेल्वे गेज रूपांतरण प्रकल्प) प्रकल्पामुळे या भागातील संपर्क यंत्रणेत सुधारणा होऊन पर्यटनाला चालना मिळेल. 590 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पखर्चाचा 30 किलोमीटर लांबीचा तांबरम-चेंगलपट्टू दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे उपनगरीय सेवेत सुधारणा होईल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होतील.
ETB PNMT नैसर्गिक गॅस पाईपलाईनच्या 850 कोटी रुपये खर्चाचा 115 किलोमीटर लांबीचा एन्नोर-चेंगलपट्टू विभाग आणि 910 कोटी रुपये खर्चाचा 271 किलोमीटर लांबीचा तिरुवल्लुर-बेंगळूरू विभाग प्रकल्पामुळे तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील ग्राहक आणि उद्योगांना नैसर्गिक वायूचा पुरवठा व्हायला मदत होईल.
या कार्यक्रमात पंतप्रधान शहरी आवास योजने अंतर्गत लाईट हाउस प्रकल्प-चेन्नईचा भाग म्हणून बांधण्यात आलेल्या 116 कोटी रुपये खर्चाच्या 1152 घरांचे उद्घाटनही झाले.
28,540 कोटी रुपये खर्चाच्या सहा प्रकल्पांची देखील पंतप्रधानांनी पायाभरणी केली. 14,870 कोटी रुपये खर्चाचा 262 किलोमीटर लांबीचा बंगळूरू-चेन्नई द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधून जाणार असून त्यामुळे बंगळूरू आणि चेन्नई दरम्यान प्रवासाचा वेळ 2-3 तासांनी कमी व्हायला मदत होईल. चेन्नई बंदर आणि मदुरवॉयलला (एनएच-4) जोडणारा हा 5850 कोटी रुपये खर्चाचा 21 किलोमीटर लांबीचा चौपदरी डबल डेकर उन्नत मार्ग बांधला जाईल. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना चोवीस तास चेन्नई बंदरापर्यंत पोहोचणे सोपे होईल.
एनएच-844 वर 94 किलोमीटर लांबीचा चौपदरी नेरालुरू ते धर्मापुरी विभाग आणि एनएच-227 वरील 3 किलोमीटर लांबीचा दुपदरी मीनसुरुट्टी ते चिदंबरम विभाग यासाठी प्रत्येकी 3870 कोटी आणि 720 कोटी रुपये खर्च येणार असून या प्रकल्पामुळे या भागात अखंड संपर्क यंत्रणा निर्माण होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमात चेन्नई एग्मोर, रामेश्वरम, मदुराई, काटपाडी आणि कन्याकुमारी या पाच रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी झाली. या प्रकल्पासाठी 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून प्रवाशांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी करणे हा या प्रकल्पांचा उद्देश आहे.
पंतप्रधानांनी चेन्नई येथील 1430 कोटी रुपये खर्चाच्या मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कचीदेखील पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे बहुविध साधनांद्वारे अखंड मालवाहतूक आणि बहुविध प्रकारे कार्यक्षमता निर्माण करेल.