
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
अकराहजार एकशे अकरा किलो साखरे पासून तयार होणार महाप्रसाद, ज्ञानदान व अन्नदानाचा होणार महाजागर
लाखो भाविक राहणार उपस्थित, ऐतिहासिक ठरणार स्वामींचा सप्ताह
शिऊर :
जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबाराय आणि निळोबारायांचे शिष्य शिऊरचे श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान शिऊर फडाचा २७७ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी स्वामींची संजीवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र शिऊर येथे होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर व्यापक प्रमाणात होणाऱ्या या सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून भाविकांत चैतन्याचे वातावरण आहे.
भव्य मंडप
तिर्थक्षेत्र शिऊर येथे दिनांक २ ते ९ ऑगस्ट दरम्यान हा सप्ताह होणार असून तब्बल २३००० स्वेअर फुटाच्या भव्य आकर्षक मंडपात राज्यातील नामवंत कीर्तन प्रवचनकारांचे कार्यक्रम होणार आहे. विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने कायमस्वरूपी भव्य कीर्तन मंडप उभारण्यात आला या सोबतच वॉटरप्रूफ मंडप देण्यात आला आहे, आकर्षक रंगसंगतीत तयार केलेला देखणा मंडप व स्वागत कमान लक्ष वेधून घेत आहे.
अध्यक्षांकडून चुलबंद निमंत्रण
हा अखंड हरिनाम सप्ताहात व्यापक प्रमाणात अन्नदान होणार आहे, दररोज परिसरातील गावातून भाकरी येणार असून दररोज जवळपास पाच हजार लिटर आमटी तयार करण्यात येणार आहे, संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी थेट चुलबंद निमंत्रण देऊन सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आमटीचे ट्रॅकर, ९ चुलांगण
अखंड हरीनाम सप्ताहात अन्नदानाला विशेष महत्व आहे, अन्नदानाची सुरुवात श्री संत शंकरस्वामी महाराजांनी २७७ वर्षापूर्वीच सुरू केली होती, ही परंपरा कायम ठेवत आधिक व्यापक स्वरूपात वाढविण्यासाठी समाधी मंदिर विश्वस्त मंडळ व सप्ताह समिती प्रयत्नशील आहे, भाविकांना भोजनासाठी ट्रॅकरच्या माध्यमातून आमटी वितरित करण्याचे नियोजित आहे तर दिनांक ९ रोजी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे, जवळपास एक लाखावरून आधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे, तब्बल १११ पोते साखरेच्या माध्यमातून महाप्रसाद तयार करण्यात येणार असून यासाठी मोठे ९ चुलांगण तयार केले आहे.
अध्यक्षांसह विश्वस्त व सप्ताह समितीचे सुक्ष्म नियोजन
ऐतिहासिक ठरणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहसाठी अध्यक्ष एकनाथराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त व सप्ताह समितीचे सूक्ष्म नियोजन केले गेले आहे, भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे सोबतच स्वच्छता, पाणी पुरवठा, वीजपुरवठा, इंधन व्यवस्था, भोजन व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, भाविकांना कीर्तन प्रवचन श्रवणासाठी दर्जेदार ध्वनीक्षेपक व थेट प्रक्षेपण करणारे एलइडी स्क्रिनची व्यवस्था केली आहे.
सप्ताहाची वैशिष्ट्य
अखंड २४ तास चालणारे भजन…१५ मिनिटांत लाखो भाविकांना एकाचवेळी महाप्रसाद वितरण…या महाप्रसादासाठी गावागावांतून एकाचवेळी येणाऱ्या विनामूल्य लाखो भाकरी…एकाच वेळी तयार होणारी तब्बल पाच हजार लिटर आमटी..अखंड चालणारे आमटी-भाकरी प्रसाद वितरण.सात दिवसाच्या या उत्सवात शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.अशा अनेकविध वैशिष्ट्यांचा हा सद्गुरू शंकर स्वामी महाराज सप्ताह असणार आहे.
नियमित हरी जागर
श्री संत शंकरस्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिरात सप्ताह काळात हरी जागर होणार असून सात दिवसीय पहारा आयोजित केला आहे, तालुक्यातील गावातील भजनी मंडळींच्या माध्यमातून अखंड नामजप होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता
संप्रदायाचे केंद्रबिंदू असणाऱ्या श्री संत शंकरस्वामी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदिच्छा भेट देण्याची शक्यता आहे, संस्थानचे अध्यक्ष , भाजपा राज्य कार्यकारणीचे सदस्य एकनाथराव जाधव यांनी त्यांना सप्ताहचे निमंत्रण दिले आहे.
शिऊर पोलिसांनी केली सप्ताह स्थळाची पाहणी
शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील , अविनाश भास्कर यांनी सप्ताह स्थळाची पाहणी करत नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.